मोहराची भाजी

Mohorachi Bhaaji

काय मंडळी, तुम्हालाही आवडतो का हो हा मोहर? माझं आणि याचं तर सात जन्माचं नात आहे असं मला वाटतं! पण याची एक गोष्ट मला अजिबात आवडत नाही ती म्हणजे मला इतका आवडणारा हा मोहर वर्षभर मिळत नाही. वर्षभर वाट बघायला लावून तो फक्त पावसाळ्याच्या दिवसातचं (ऑगस्ट महिन्यात) माझ्या भेटीला येतो. उळशी नावाच्या वेलीवर येणारा हा मोहर आपल्याकडे सहसा म्हाळाच्या महिन्यातचं बाजारात बघायला मिळतो. तो दिसायला बऱ्यापैकी आंब्याच्या मोहरासारखाचं असून कोकणात याला तेलपठाचा मोहर असं सुद्धा म्हणतात.

अगदी लहान असल्यापासून मी या मोहराच्या भाजीची माझ्या आज्जीच्या हातची चव चाखल्यामुळे तर माझ्या आयुष्यात त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. मला अजूनही आठवतं कि त्यावेळीही मोहरावरचं माझं हे असं प्रेम बघून घरातले सगळे मला हसायचे. इतर कुणाला तो इतका आवडायचा नाही आणि अजूनही आवडत नाही. त्यामुळे कदाचीत त्यांच्यासाठी माझी आणि मोहराची ही Love Story अनाकलनीय राहिली असावी.

माझ्यासाठी मात्र हे प्रकरण अगदी मला आठवत असलेल्या पहिल्या घासापासून #Love_At_First_Bite असंच असावं. लहान असताना मी, इतर सर्वांप्रमाणे, फक्त खाण्याशी मतलब ठेवायचो. एखादी गोष्ट शिजून ताटात येण्याअगोदर ती कशी दिसतं असेलं याच्याशी माझं काही देणघेण नसायचं. पण मी जसजसा मोठा व्हायला लागलो तसं मला समजायला लागलं की तो मोहर दिसायलाही इतर भाज्यांपेक्षा खुपचं वेगळा आहे आणि मग नंतर मी बाजारात जाऊ लागल्यावर तर नेहमीच्या भाज्यांमधे त्याचं ते टपोर, निराळं आणि मनमोहक असं रूप माझं लक्ष नाही वेधून घेऊ शकलं असतं तर नवल!

जसं त्याचं दिसणं निराळं तशीचं त्याची चवसुद्धा काही अंशी #हटके म्हणावी अशीचं असते. अगदी पहिल्या घासालाचं तुम्हाला ते कळतं आणि त्या चवीवर जर तुमचा जीव जडला तर तुमच्या जीभेच्या सातबाऱ्यावर या मोहराचं नाव कायमच लागलं म्हणून समजा. त्यानंतर मग तुम्ही खूप दिवसांनी भेटणाऱ्या तुमच्या प्रेयसीच्या वाटेकडे जितक्या आतुरतेने डोळे लावून बसता तितक्याचं आतुरतेने प्रत्येक वर्षी या मोहराची सुद्धा वाट बघू लागता. आणि अशी चातकासारखी वाट बघीतल्यावर मग तो जेंव्हा जेंव्हा आणि जिथे जिथे दिसेलं तेंव्हा तेंव्हा तुमच्या कानात Bollywood Style “तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे…” वाजू लागलचं म्हणून समजा!

मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा “त्याची” चातकासारखी वाट बघतं होतोचं… आणि परवा तो अचानकपणे मला बाजारात दिसला!

Mohor

मोहराची भाजी

१. पाण्यात मीठ आणि तूरडाळ टाकून मोहर उकडून घ्या. चाळणीत काढून घ्या.
२. भांड्यात २ चमचे तेल तापवून मोहरी, जीरे, कढीेपत्ता आणि हिंगाची फोडणी घ्या.
३. त्यात कांदा टाकून तो मऊ होईपर्यंत परता.
४. कांदालसून मसाला (किंवा मिरची पावडर) आणि हळद घालून दोन मिनीट शिजू द्या. मी बदल म्हणून कधीकधी हिरवी मिरची सुद्धा वापरतो.
५. मोहर पिळून घेऊन त्याचं पाणी काढून घ्या आणि कांद्याच्या मिश्रणात घाला. खोलगट झाकणात अर्धी वाटी पाणी घालून झाकून ठेवा आणि १० मिनीटं शिजवून घ्या.
६. मीठ घाला, मिक्स करा. अजून दोन मिनीट शिजू द्या. कोथिंबीर, खोबर घाला. टेस्ट करा, गरज असल्यास तिखट-मीठ घाला.
७. गरमागरम वाढा.

 

Shiv Medhe is a prolific food chronicler and a popular member of the Angat Pangat Facebook Group. 

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.