एका मोदकाची दुसरी गोष्ट

Modak

एक सर्वव्यापी बाप्पा
तिचे प्रयत्न वर्षानुवर्षे बघत आला आहे .
आईकडे आईने केलेले ,
सासरी सासूबाईंनी केले.
हीचं काम सारण करणे .
“करून बघणे ” ह्या सदरात
साधारण गोल आकारात जमा होतील असे
एखाद दुसरे मोदक,
प्रयोग म्हणून करणे,
मग नैवेद्याच्या वेळी कुठंतरी लपवणे,
आणि मग जादूने तिच्या ताटात हजर.

वर्षे सरली.
तिने स्वतः करायला सुरवात केली
आणि बापा प्रचंड कुतूहलाने बघायला लागला.
लहान मुलाचे दर वर्षी फोटो काढतात
तसे तिच्या मोदकांचे फोटो होऊ लागले.
रेखींव, सुंदर ही विशेषणं आस पास हे फिरकत नसत ,
आणि तरी तिच्या घरचे सगळे
कौतुकाने मोदक खात .
(त्यांना पर्यायच न्हवता…)

मग ती फसबुकवर अंगतपंगत ची सभासद झाली,
आणि चतुर्थी च्या काही दिवस आधी
तिला शिट्ट्या मारून उकड काढण्याची
नवीन युक्ती कळली.
शिट्ट्या मारल्या , उकड केली,
खूप खूप मळली .
गणपती बाप्पा चकित.

मग अनेकांनी फोटोत आणि व्हिडियो द्वारे
केलेल्या प्रात्यक्षिका प्रमाणे मोदक केले आणि वाफवले .
गणपती बाप्पा च्या तोंडावर हसू .

हुश्श्य करून ओटा आवरून
ती क्षणभर विश्रान्नतीत बसली .
आणि स्वतःची बोटे न्याहाळू लागली .

तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश .
अनेक निऱ्या वाले मोदक
आपल्या बोटानी का होत नाहीत
हे कोड सुटलं .
साडी सहा वार असते ,
म्हणून निऱ्या करताना जाणवत नाही .
पण एवढ्याश्या मोदकाच्या पारीत फरक समजतो.
लांब सडक निमुळती बोटे वाल्या लोकांना
खूप निऱ्यान्चे मोदक छान जमतात .

प्रश्न असा की मग
आपण मोदक करावे का नाही ?
तिने बाप्पा कडे बघितलं .
क्षणभर तिला भास झाला , की
बापा ने “थंब्स-अप ” च चिन्ह हाताने दाखवलं .
तिने नैवेद्य दाखवला ,
आणि मोदक वाढायला घेतले.
तिची बोटं , हे तिचे आणि बाप्पा चे गुपित .

आता आठच मोदक राहिलेत .

आणि तिला उलगडा झाला !
मोदक मनात करायचे असतात .
त्यात भक्तीचे आणि आनंदाचे सारण भरायचं असतं .
बोट कशी का असेनात ,
बापाला हे मोदक कलेचा आविष्कारच वाटतात .

गणपती बापा मोरया !

 

Suranga Date is a prolific poet and a much loved member of the Angat Pangat Facebook Group.

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.