सरकारी शाळांमधील खाद्यसंस्कृती

कोठाळे बुद्रुकच्या मास्टरशेफ स्पर्धेतील स्पर्धक

सरकारी शाळा आणि त्यातलं जेवण म्हणलं की आपल्याला आठवतो तो तांदूळ किंवा टिपिकल पिवळी मूग डाळ- भाताची खिचडी.1995 साली शालेय पोषण आहार योजनेची सुरूवात झाली आणि 2002 सालापासून विद्यार्थ्यांना शाळेत शिजविलेला आहार देणे सुरू आहे. सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा आहार दिला जातो. यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 450 कॅलरीज आणि 12 ग्रॅम प्रथिने तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 700 कॅलरीज आणि 20 ग्रॅम प्रथिने असलेला आहार दिला जातो. यात वरण- भात, सांबार भात, मटकी उसळ, हरभऱा उसळ आणि भात, खिचडी असे वेगवेगळे प्रकार असतात तसेच अधूनमधून फळे आणि अंडीही असतात. मात्र या सरकारी कार्यक्रमाच्या पलीकडे जात काही शाळा स्वत:हून मुलांच्या पोषक आहारासाठी वेगळे उपक्रम घेत आहेत. या लेखात अशाच काही उपक्रमांची माहिती करून घेऊयात.

मुलांनी चांगलं शिकावं, भरपूर खेळावं, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे, त्यांना पोषण मिळेल असा चौरस आहार द्यायला हवा. याच गोष्टीवर सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या विस्ताराधिकारी प्रतिभा भराडे यांनी आपले लक्ष केंद्रित केले. तुम्हांला सांगायला हवे की सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट हे ‘ज्ञानरचनावाद’ या क्रांतिकारी संकल्पनेची महाराष्ट्राला ओळख करन देणारे पहिले यशस्वी बीट आहे. सुमारे 40 जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश असलेल्या या कुमठे बीटमध्ये पाठांतर आणि घोकंपट्टीवर बंदी आहे, इथले विद्यार्थी हसत- खेळत, संकल्पना आणि त्यामागचे मूळ तत्त्व लक्षात घेऊन शिकतात.

विस्ताराधिकारी म्हणून प्रतिभा भराडे यांची २००३ साली साताऱ्याला नेमणूक झाली. सुरुवातीपासूनच पारंपरिक शिक्षणापेक्षा मुलांना जबाबदार नागरिक आणि संवेदनशील माणूसबनवणं त्यांना जास्त गरजेचं वाटत होतं. इथे काम करताना त्यांच्या लक्षात आलं की जरी शिक्षक आपल्यापरीने मुलांना शिक्षणाची गोडी लावायचा प्रयत्न करत होते तरी त्या प्रयत्नांना खास यश मिळत नव्हते. प्राथमिक शिक्षण पुर्ण होण्याआधीच अनेक मुले शाळा सोडून जात होती. त्यांना हे कळून चुकले की या मागचे मुख्य कारण होते, गरिबी आणि कुपोषण. शाळेतील अनेक मुलांची कुटुंबे दारिद्र्यरेषेच्या खाली होती. उपाशीपोटी शाळेत येऊन अभ्यासाकडे लक्ष देणे त्यांना जमत नव्हते. शिवाय, शाळा संपल्या संपल्या घराला हातभार लावण्यासाठी मुलं कामालाही जात होती.

हे लक्षात घेता त्यांनी प्राथमिक शाळेतील मुलांना नापास करायचे नाहीअशा प्रकारची सूचना २००४ सालीच शिक्षकांना दिली होती. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने 2009 साली पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना नापास करू नयेहा आदेश आणायच्या ५ वर्ष आणि आधी कुमठे बीट मध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत होत होती.

या परिस्थितीत दिवंगत नरेंद्र दाभोलकरांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर आमच्या मदतीस धावून आल्या. डॉक्टर असल्यामुळे पोषक आहाराचे महत्व त्यांना माहित होते. त्याचबरोबर शैलाताईंचा सेंद्रिय शेतीचाही मोठा अभ्यास आहे. आम्ही मुलांना पोषक आहार कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. मुलांना शाळेत मिळणारे दुपारचे जेवण कसे पौष्टिक बनवता येईल याचा आम्ही विचार सुरु केला. जेवणासाठी लागणाऱ्या भाज्या आणि फळे, ताज्या आणि रासायनिक प्रक्रिया मुक्त असाव्यात यासाठी आम्ही शाळा शाळांतून परसबागा बनवायला सुरुवात केली. टोमॅटो, मुळा, कोथिंबीर, गाजर, काकडी आणि पालेभाज्या शिक्षक आणि मुले मिळून पिकवू लागली,” भराडे मॅडम सांगत होत्या.

त्यांनी पुढे सांगितले की या उपक्रमाला ‘निसर्गातले बालवैज्ञानिक’ असे नाव देण्यात आले. “या प्रयोगामुळे मातीही कसदार झाली आणि मुलांना दररोज ताज्या भाज्या आणि फळे मिळू लागली. त्यांच्या तब्येतीवर याचा लगेच परिणाम दिसून आला. शाळेतील अनेक मुलांची कुटुंबे शेतीचा व्यवसाय करतात. त्यांनी घरीही या भाज्या आणि फळे लावायला सुरुवात केली. रोपांची हळू हळू होणारी वाढ, त्यावर येऊन बसणारे कीटक आणि पक्षी या मध्ये मुलांनां कुतूहल वाटू लागले. शिवाय बागकामाच्या या उपक्रमामुळे शिक्षक आणि मुलांमधली गट्टी वाढली. मग मुलांना अभ्यासात किंवा इतर कोणत्या अडचणी येतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न शिक्षक या अनौपचारिक गप्पांमधून करायला लागले.” भराडे मॅडम सांगत होत्या. शिवाय विद्यार्थ्यांच्या आणि काही शिक्षकांच्या अडचणी ‘मानसिक समस्या’ या प्रकारात मोडणाऱ्या होत्या. अशा वेळी साताऱ्यातील डॉ. हमीद दाभोलकर यांसह अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी स्वतः होऊन वेळ काढून मुलांना मदत केली असल्याचा कृतज्ञ उल्लेख प्रतिभा भराडे करतात.

देसलेपाडा येथील अंगणवाडीतील खाद्यमनोरा

मुलांच्या आरोग्याचा पाया पक्का झाल्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि व्यक्तिमत्त्व विकास साधणे, तुलनेने सोपे झाले. आज या कुमठे बीटची प्रगती पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही अनेक शिक्षक आणि शिक्षणप्रेमी कायमच येत असतात. मात्र त्याविषयी लिहिल्यास विषयांतर होईल, म्हणून त्याबाबत इथे लिहित नाही.

अशीच कथा आहे अमरावतीतल्या मेळघाटमध्ये 10 हून जास्त वर्षे काम करणाऱ्या विनोद राठोड या मुलांसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या शिक्षकाची. मेळघाटचा परिसर जितका त्याच्या निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध आहे, तितकाच तेथील आदिवासी मुलांच्या कुपोषणाबद्दलही ओळखला जातो. रानावनात राहणारे आदिवासी, अगदी गरजेपुरतीच शेती करणारे. यांची भाषाही वेगळी, इथल्या मुलांना शिक्षणाची गोडी लावायची तर त्यांच्या भाषेत, त्यांच्या कलाने घ्यावे लागेल, हे राठोड सर जाणून होते. शिवाय पोटात काही गेलं असेल तर मुलांचे अभ्यासात मन लागेल याची जाणीव त्यांना होतील. बुटीदा जिल्हा परिषद शाळेत काम करताना ते या मुलांना पुरेसा शालेय पोषण आहार मिळेल, याची काळजी घेत. तसेच नुसता भात किंवा खिचडी दररोज खाणे कंटाळवाणे होऊ शकते, म्हणून त्यात वेगवेगळ्या भाज्या मिसळून मुलांना मसालेभात किंवा पुलावासारखी चविष्ट खिचडी देण्याची पद्धतही त्यांनी बुटीदा शाळेत सुरू केली. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या कांदे, बटाटे, लसूण, गाजर, पालक, वालाच्या शेंगा यांची शाळेच्या परिसरातच त्यांनी लागवड केली होती. शिवाय घरोघरी जाऊन पालकांना भेटून मुलांच्या पोषणाचे महत्त्व राठोड सर पटवून द्यायचे. मुलांना वाढत्या वयात पुरेशी प्रथिनेही मिळाली पाहिजेत म्हणून अंडी, डाळी- उसळी यांचा आहारात आवर्जून समावेश करा, अशी विनंती ते करायचे.

शिवाय आदिवासी बांधव खात असलेली कोवळ्या बांबूची भाजी, रानवाल, पावसाळी रानभाज्या यांना कधीच विसरू नका, हे ही ते कळकळीने समजावून सांगायचे. या सगळ्याचे फळ म्हणून 2007 सालाच्या आसपास त्यांनी 8 कुपोषित विद्यार्थ्यांना कुपोषणातून बाहेर काढून सशक्त आणि निरोगी बनविले. या कामाबद्दल आणि पालकांच्या जाणीव जागृतीबद्दल तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रशस्तीपत्रक आणि मुंबईहून दौऱ्यावर आलेल्या आरोग्य आयुक्तांनी 500 रुपयांचे रोख बक्षीस देऊन सत्कार केला होता. राठोड सर आता अमरावती जिल्ह्यातच सालनापूर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. इथे तर त्यांनी 100 प्रकारच्या भाज्यांची परसबाग बनविलेली आहे.

सालनापूर शाळेत एक एकर परिसरात सातपानी भेंडी, रानवाल, काकडी, मुळा, गाजर, सर्व प्रकारचे भोपळे, कांदे, बटाटे, कोथिंबीर, गावरान गवार, पालक, राजगिरा, लाल माठ, मेथी, चिवळ, घोळ, देशी शेपू, सहा प्रकारचे दोडके अशा अनेक भाज्या तसेच कारळे, सूर्यफूल यासारख्या तेलबियांची रोपे त्यांनी लावली आहेत. याची बियाणे आणि रोपं गावातील शेतकऱ्यांनी दिली आहेत तसेच दुसऱ्या गावी गेल्यानंतर तिथल्या विशेष भाज्यांची रोपं किंवा बियाणे राठोड सर आवर्जून आणतात. त्यांनी आणि उमेश आडे या सहशिक्षकाने मिळून गावकऱ्यांच्या सहकार्यातून तसेच स्वत: थोडा आर्थिक हातभार लावून या बागेच्या निगराणीसाठी सुमारे 45 हजारांचा खर्च करून बोअरवेल करून घेतलेली आहे. शिवाय शाळेतील विद्यार्थी रोपं लावण्यापासून, पाणी घालण्यापासून सर्व निगराणी करतात आणि या भाज्यांचे चविष्ट पदार्थ खातातही. राठोड सर सांगतात मुलांना रोजच्या जेवणात रोज ताजे सलाद असते- कधी कोवळी मेथी, कधी कांद्यापातीचा घोलाणा तर कधी हिरव्या टोमॅटोची किंवा लसणाच्या पातीची चटणी. गावकरी सुद्धा या बागेतून भाज्या हक्काने घेऊन जातात- अट एकच असते, फक्त नवीन बियाणे किंवा रोप मात्र देत राहायचे.

विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनवलेल्या पदार्थांनी सजवलेले टेबल

शाळेत भाज्या लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे- अन्न शिजविणे. बहुतांश घरांमध्ये स्वयंपाकाची ड्यूटी ही घरातील महिलांकडेच असते. पण अन्न शिजविण्यामागे किती मेहनत लागते, केवढे कौशल्य लागते हे मुलग्यांनाही कळावे आणि त्यांनाही स्वयंपाकात रस निर्माण व्हावा म्हणून राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पाककलेचा तास किंवा स्पर्धा घेतल्या जातात. जालन्यातील कोठाळे बुद्रुकच्या जि.प. शाळेत तर मुलगा आणि मुलगी अशा जोडीने मिळून 45 मिनिटांत एक पदार्थ तयार करून सादर करायचा असतो. 2012 सालापासून ‘कोठाळे बुद्रुकचा मास्टरशेफ’ या नावाने ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पुरी- भाजी, बटाटेवडा, भजी किंवा वेगळ्या प्रकारच्या उसळी विद्यार्थी बनवितात. या विषयी राजू सावंत सर सांगतात, “प्रत्येकाला पोट आहे आणि भूक लागते, तर ती प्रत्येकाला भागविता यायला हवी. टीव्हीवरील मास्टरशेफ या कार्यक्रमावरून मला ही स्पर्धा घेण्याचे सुचले, सुरूवातील गावातून मुलगा- मुलगीची जोडी कशाला असा विरोधही झाला, पण मला स्त्री- पुरूष समानता मुलांच्या मनावर बिंबवायची होती, म्हणून मी मुद्दामच ही जोडीची अट ठेवली होती. आता मात्र स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत असून केवळ स्पर्धेतच नाही तर इतर वेळीही मुले घरी आई- आजीला स्वयंपाकात मदत करतात”

लातूरच्या अनिता जावळे मॅडमही माटेफळ आणि बोरगावच्या जि.प. शाळेत असाच पाककृतीचा उपक्रम आठवड्यातून एकदा घेतात. त्यातही मुले- मुली एकत्र येऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भेळ, पोहे, गोपाळकाला, लाडू, पिठलं- भात असे पदार्थ बनवितात. जावळे मॅडम यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पदार्थ बनवून आणि खाऊन झाला की त्याची पाककृती त्या मुलांना लिहायला सांगतात. त्यातून विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्येही वाढीला लागतात. जावळे मॅडम म्हणतात, “साधा कांदा चिरतानाही डोळ्यात केवढं पाणी येतं आणि हाताला जखम होऊ नये म्हणन कसं जपावं लागतं, याचा अनुभव घेतला की मुलांना घरातील आई- आजीच्या कामाचे मोल कळते. शिवाय ही पदार्थ बनविण्याची प्रक्रिया आनंददायीही आहे, ते त्यांना उमजते. त्यामुळे निदान माझ्या वर्गातील मुले तरी या स्वयंपाकाच्या कामाला दुय्यम समजणार नाहीत हा विश्वास वाटतो.”

याशिवाय राज्यात अनेक ठिकाणी मुलांच्या पोषणाबाबत वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. बीडमधील गेवराई तालुक्यात मुला- मुलींचे हिमोग्लोबिन वाढावे आणि पूरक आहार मिळावा म्हणून गूळ- शेंगदाण्याच्या पंगती सुरू आहेत. शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्या सहकार्यातून मुलांना आठवड्यातून किमान दोन दिवस गूळ- शेंगदाणे, चिक्की, गुडदाणी, गूळ- खोबरं, खारीक- खोबरं, चणे- फुटाणे असा पोषक आहार दिला जातो. तर सिंधुदुर्गमधील वरवडे क्रमांक एक मधील जि.प. शाळेत दर पावसाळ्यात रानभाज्या विकणाऱ्या आजींना तिथल्या शिक्षिका ऋजुता चव्हाण शाळेत बोलावितात. नवीन पिढीला भारंगी, टाकळा, कुर्डू या रानभाज्या कशा ओळखायच्या, त्यांचे फायदे काय, त्याचे पदार्थ कसे बनवावेत याची माहिती देतात. ठाण्यातील शहापूरमधील देसलेपाड्याच्या शाळेत अंगणवाडीपासूनच पोषक आहारासंदर्भात खाद्य पिरॅमिडची प्रतिकृती तयार करून मातांना या आहाराचे महत्त्व समजावून दिले जाते, असे तेथील मंगल डोईफोडे मॅडम कळवितात. या पिरॅमिडमध्ये अंडी आहेत, डाळी, कडधान्ये आहेत आणि पालेभाज्या- फळभाज्याही आहेत.

एकूणच राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये पोषणमूल्ययुक्त आहारासंदर्भात नवनवे प्रयोग चालू आहेत, ज्याच्या माध्यमातून नवी पिढी सशक्त आणि समृद्ध होईल अशी आशा करूयात.

Snehal Bansode-Sheludkar is a member of the Angat Pangat Facebook Group and works for Samata Shiksha as a special correspondent. 

Also see

3 Comments
  1. What an eye opening, amazing article about so many folks doing such outstanding work in our rural areas to bring nutrition as well as meaningful education to our children. Snehal, thank you for writing this, and best wishes in your work !

  2. अप्रतिम लेख!!! दिलेली माहिती ही प्रामुख्याने गावाकडली आहार आणि खाद्यसंस्कृतीबद्दलची जागरूकता आणि आस्था दाखवते. अतिशय स्तुत्य उपक्रम आणि आपण ही माहिती एकत्रित मांडल्याबद्दल अभिनंदन

  3. छान वाटलं वाचताना. किती छोट्या छोट्या गोष्टी मुलांसाठी आपण करू शकतो हे लक्षात आलं. लिहिलंयसही मस्त.

Leave a Reply

Your email address will not be published.