श्रीखंड

Shrikhand

चांदीच्या वाटीत हलक्या पिवळसर केशरी रंगाचे चारोळी, बदाम, वेलची जायफळ आणि केशराचा स्वाद. बरोबर पुरी, बटाटा भाजी, डावीकडचे आणि वरण भात. लहानपणापासून दसरा, आणि गुढीपाडव्याला असे ताट हमखास सजलेले असायचेच. १९८५ मध्ये बंगलोरला स्थलांतर केले, स्वयंपाकघरच नवीन होते हाताशी आजच्या सारखा मोबाईल तर नाहीच पण साधा फोन ही नव्हता. होते एक पुस्तक “रुचिरा”

   मी प्रयोग करायची पण बरा चवीचा पदार्थ बनायचा. आईच्या सगळ्या चवी आठवत मी आहे ते  गोड मानायचीच पण नवीन संसार असल्याने नवरा ही ते उत्साहाने खायचा. मग आईला पत्र जायचे आईचे उत्तर येईपर्यंत माझा त्यातील रस जावून मी दुसऱ्या पदार्थांची चव घेतली असायची. आणि मग एक दिवस श्रीखंड प्रयोग केला आणि चक्क चक्क्याने रडवले

    सरळ मिठाईच्या दुकानात गेले आणि चक्का मागितला,दुकानदार भंजाळून गेला, मला कानडीचा गंध नाही, इंग्रजी चा सराव नाही व दुकानदार हिंदी बोलणे ऐकायचा ही नाही. जाऊ दे कसं सांगता येईल असा विचार करत घरी आले. मग अश्याच जवळ एक मराठी जाणणाऱ्या हुबळीच्या शेजारणीला विचारले तेंव्हा तिने उलगडा केला की बंगलोरला श्रीखंड फारसे कोणीच खात नाही तर चक्का कुठला मिळायला. मला बंगलोरला मिळालेला पहिला धक्का होता. एकतर पुण्यात घरी कधीच दही टांगून चक्का केलेला पाहिल्याचे आठवत नव्हते किंवा कदाचित आईचे हे प्रयोग आम्ही लक्षात घेतले नसावे कारण इकडे येईपर्यंत हे आपल्याला ही करायचेच आहे पुढे आयुष्यभर ह्याची जाणीव झाली नव्हती. त्यामुळे पुण्यात कधीही मनात आणा की चितळे बंधूचा उत्तम चक्का आणायचा की चुटकीसरशी श्रीखंड तयार.

    मग एकदा प्रयोग झाला आणि श्रीखंड खायची हौस फिटली. दूध गायीचे पाणीदार त्याचे दही काय असणार आणि चक्का तो किती पडणार. 2/3 वर्ष पुण्यात गेले की मनसोक्त पोटभर श्रीखंड खायचे जसे काही उंटासारखे आणि आठवणीत रमायचे. लेकीच्या पहिल्या वाढदिवसाला पुण्याहून घरचे आले येताना श्रीखंड च घेवून आले. मला हटके बेत हवा होता ना. बहुतेक सगळ्या मुलांनी वाटीतले श्रीखंड न खाता टाकून दिले होते बघून जीव इतका हळहळला होता,मनात एक निश्चय केला की इकडच्या लोकांना जेवायला बोलावले तर श्रीखंड कधीच करायचे नाही.

  पुढे इथल्या नातेवाईकांची अंगतपंगत ठरवली आणि श्रीखंड बेत ठरवला तर एक दीर आणि जाऊ बरेच लांब जावून “श्रीराज लस्सी बार” मध्ये खूप घट्ट दही मिळायचे ते आणून टांगून चक्का करायचे व मस्त श्रीखंड घेवून यायचे. आम्ही दोघी जावा पुण्याच्या त्यामुळे आम्ही हरखून जायचो तर हुबळीची जाऊ आम्हांला हसायची. पुण्यातील लोक म्हणून.

   महाराष्ट्र मंडळ च्या कमिटी वर काम करताना गणपती उत्सव महाप्रसाद साठी श्रीखंडाचा बेत ठरवला. गोकुळ दूध उत्पादक संघात ओळख काढली मग पन्नास किलो चक्का एसी बस मधून बंगलोरला आणला. आम्ही आठ,दहा जणी घरातील मोठे स्टीलचे डबे व पुरण यंत्र घेवून जमलो. श्रीखंड तयार केले मग पुन्हा ते डबे फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीचा महाप्रसाद गाजवला होता. सभासदांना ही अप्रूप वाटले,सगळ्या कार्यकारिणीचे कौतुक केले गेले आणि आम्हांला धन्य व्हायला झाले.

  हळूहळू तयार चक्क्याची सवय गेली व मी उसासे टाकणे बंद केले. अमूलचे श्रीखंड मिळायला लागले व अचानक आलेली लहर शमविण्यासाठी उपयोगी पडू लागले. आता नंदिनी डेअरी चे दही बरेच घट्ट मिळते,जास्ती प्रमाणात करायचे तर तयार दही टांगून काही तास वाचवले आणि आपण सोपे उत्तर शोधले म्हणून आपण च आपली पाठ थोपटून घ्यायची. नुकतेच नंदिनी डेअरी ने छोट्याशा डब्यात आम्रखंड बाजारात आणले आहे. आपल्या हौसेला योग्य म्हणून घेत होते तर दोघी,तिघींनी विचारलेच  की हे काय स्वीट आहे? ३३ वर्षांपासून ठरलेली सवयीची उत्तरे देते आणि एकटीच हसते. आता आई नाही पण पुण्यात गेले की बहीण एकदा तरी माझ्या साठी श्रीखंड बनवते मुलगी काहीही हं तुझे वेड momzy म्हणत हात जोडते मी मात्र सगळ्यांकडे दुर्लक्ष करत माझी आणि श्रीखंडाची युती अभेद्य आहे असे म्हणत डोळे मिटते व त्याच लहानपणीच्या आठवणीत रमून जाते.

 

Swati Kale is a member of the Angat Pangat Facebook Group.

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.