शेंगोळ्याचे लाडू

माझे वडील आणि नवरा दोघेही बेळगाव जिल्ह्यातले.आमच्याकडे गेल्या दोन पिढ्या तरी कर्नाटक महाराष्ट्रच मिश्रण आहे. माझे सासरे कर्नाटकातले आणि सासूबाई बेळगावच्या. सासूबाईंच्या आई वडिलांचे, त्यांच्या दोन बहिणींची आणि भावांचीही अशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेशेवरची लग्नं. बेळगाव हे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमारेषेवरील महत्वाच शहर. इथली भाषा, खाद्यपदार्थ, वेशभूषा सर्वातच दोन संस्कृतींचा मिलाफ दिसतो.

पु. ल. चे ही बेळगावी काही वर्षे वास्तव्य होते. त्याचा उल्लेख आणि भाषेचा संदर्भ त्यांच्या साहित्यात येतो. मराठी व्याकरणाच्या कुठल्याच नियमात न बसणारी आणि तोंडावर हलकसं हसू पसरवणारी इथली बोली, इथलं आम्बट गोड सार, नुसतं सारच नाही तर पावभाजीही चिंच-गुळाची, इथलं राहणीमान आणि वेशभूषा सगळच खुद्द महाराष्ट्रापेक्षा थोडं हटके आहे.

जसजसं कर्नाटकच्या सीमेकडे जावू तसं स्वयंपाकातं आमसूल अदृश्य होवून चिंचेचा वापर वाढत जातो. भाताचे वेगवेगळे प्रकार वापरत येतात. स्वयम्पाकातला तिखटपणा कमी होतो.

माझं लग्न झाल्यावर माझ्या आत्याने माझ्या सासरी शेंगोळयाचे लाडू करून पाठवले होते. ह्या आत्याचं गाव म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकाची सीमाच! गाव जरी कर्नाटकात असलं तरी १० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातलं शहर! तर तिने केलेले हे लाडू माझ्या सासरी खूप आवडले. महाराष्ट्रातच वाढलेल्या मीही तेव्हा ते पहिल्यांदाच चाखले.त्या खुमासदार लाडवांची चव मात्र अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.

सीमाभागात राहणाऱ्या दिगंबर जैन कुटुंबांत शेगोळ्याचे लाडू खास प्रसंगासाठी हमखास केले जातात.घरगुती दूध आणि तूप वापरून केलेल्या ह्या लाडवांना अगदी ‘earthy’ स्वाद येतो.करताना थोडी मेहनत पडते पण लाडू एकदम फक्कड होतात.

बेळगाव जिल्हातील जमीन सुपीक, भरपूर शेती त्यामुळे दुध दुभते, खाण्याचे शौकीन त्यामुळे इथे खाद्यपदार्थांचे भरपूर नमुने आहेत. मुंबई पुण्याकडच्या सामान्य मराठी माणसाला माहित नसलेले ताम्बित्त, फुग्याची थालीपीठ, गव्हाची हुग्गी, रसवंती गृहात आलेपाक, चिरमुरे भिजवून, चिंचेचा कोळ आणि फुटण्याची पूड घालून केलेला सुसला हा पोह्यांसारखा पदार्थ, बटाट्याऐवजी मोडाच्या मटकीचे समोसे, बटवा तसंच गव्हल्याची खीर, दूधाचं सार असे कितीतरी unique पदार्थ इथे केले जातात.

त्यातल्या खास आणि पौष्टिक शेंगोळ्यांच्या लाडवांची रेसीपी मी इथं देतेय. ह्या दिवाळीला नक्कीच करून पहा.

Shengolyache Laadoo

साहित्य :

शेंगोळे बनवण्यासाठी:

 • १ भाग जाडसर बेसन
 • १/२ भाग दूध
 • चवीपुरते मीठ
 • तळण्यासाठी तूप

एकतारी पाकसाठी:

 • १ भाग साखर
 • १/२ भाग किंवा साखर जेमतेम बुडेल एव्हडं पाणी
 • चवीपुरती वेलदोड्याची पूड

कृती

 1. बेसन चवीपुरत मीठ घालून घट्ट माळून घ्या
 2. हा दुधात मळलेला बेसनचा गोळा २० मिनिट झाकून ठेवा
 3. हाताने त्याच्या लाम्बुळक्या लड्या करा
 4. ह्या लड्या तुपात गुलाबी रंगावर खरपूस तळून घ्या
 5. थंड झाल्यावर मिक्सर मधून त्याची पूड करा.त्याची भरडच निघते.
 6. स्टीलच्या चाळणीतून ही भरड चाळून घ्या. चाळल्यामुळे मोठी भरड वेगळी होते.ती पुन्हा दळून घ्यावी. मोठी भरड पाकात एकसारखी मुरत नाही.

पाक:

 1. १ वाटी भरडीसाठी पाऊण वाटी साखरेचा पाक असा हिशेब ठेवा.
 2. साखर नेमकी बुडेल एव्हडे पाणी घालून एकतारी पाक बनवा.
 3. १०-१२ मिनिटे साखरेचे पाणी उकळल्यावर एकतारी पाक बनतो.
 4. पाकाचा एक थेंब थंड पाण्यात सोडून पहा पाकाची गोळी बनली पाहिजे.हा एकतारी पाक.
 5. ह्या गरम पाकात लगेच शेंगोळ्यांची भरड घालून छानपैकी मिसळा.स्वादापुरती वेलदोडयाची पूड घाला.
 6. आणि हे मिश्रण वरती झाकण ठेवून एक तास असेच बंद राहू द्या.
 7. एका तासानंतर लाडू वळायला घ्या.
 8. हे स्वदिष्ट लाडू आपल्या समारंभाचा आनंद नक्कीच द्विगुणीत करतील.

Stages of Shengolyache Laadoo

 

Ashwini Dastenavar is a member of the Angat Pangat Facebook Group.

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.