लघु कथा: गंध

बेंगलोरला येऊन अजून वर्षही झालं नव्हतं, पण इथला उन पावसाचा खेळ तिला आवडला आणि मानवलाही होता. मागच्याच आठवड्यात सातवा महिना लागला होता. पाच वर्षांनी ही चाहूल लागली होती.

नमिताला तसे डोहाळे असे काही खास लागले नव्हते फक्त काही पदार्थ खावेसेच वाटायचे नाहीत खासकरून गोड पदार्थ. डॉक्टरांच्या सल्याने रोज फिरणं, योगा असं सगळं व्यवस्थित करत होती. डेड-एंड गल्लीतले शेवटून दुसरे घर त्याचे होते. त्यांच्या घरातून बाहेर पडले आणि उजवीकडे वळले की साधारण दहा घरे ओलांडून परत उजवीकडे वळले की नंदिनीचे दुकान लागायचे, तिथून साधारण २०० मीटर गेलं की एक छोटीशी बाग लागायची. तिथेच ती रोज संध्याकाळी फिरायला यायची. मग त्या बागेला बाहेरूनच वळसा घालून पुढच्या गल्लीतून वळली की त्या नंदिनीच्या जवळच्या रस्त्यावर यायची. जाताना दुकान उजव्या हाताला असायचं, येताना डाव्या हाताला. त्याच्याच समोरच्या कॉर्नरवर एक पारिजातकाचं झाड होतं. पूर्वी ती सहज खाली वाकून त्याची फुलं उचलून घ्यायची पण आताशा ते थोडं अवघड वाटायला लागलं होतं. त्या घरातल्या एक मावशी बरोबर त्याच वेळी रांगोळी घालताना दिसायच्या. एक दोनदा त्यांनी तुला ती पारिजातकाची फुलं उचलून दिली होती. त्यामुळे हसून ओळखीच्या होत्या.

काही महिन्यात बरेच चेहरे ओळखीचे झालेच होते. भाषा माहित नसली तरी हसून एकमेकांशी ओळख सांगितली जात होती.

आता आताशा पोट छान गरगर्रीत दिसायला लागलं होतं. शेजार पाजारच्या जुजबी ओळखीही झाल्या होत्या. वरलक्ष्मीच्या हळदीकुंकवाला, मग गणपतीत शेजारच्या चार घरी येणं जाणं झालं होतं. घर मालकीण बाई वरती राहायच्या, त्या हौसेने इडली, डोसे, असे काय काय केले की एक वाटी आणून द्यायच्या. आजही ती नेहेमीच्या रस्त्यानेच चालायला गेली होती. सकाळीच आईशी फोन वर बोलत ती त्या पारिजातकाच्या झाडाच्या घराच्या तिथून जात असताना एका वासाने क्षणभर थबकली. एक ओळखीचा असा मंदसा गोड वास एकदम तिच्या नाकात घुसला आणि जिभेवर एकदम चव आली. आईच्या हातचा शिरा तिला तिच्या जिभेवर असल्यासारखा वाटला. आई शिरा करायची तो कधीच चिमूट, मुठीच्या हिशोबाने नसायचा. पांढरा शुभ्र बारीक रवा, घरच्या तुपावर मंद आचेवर भाजताना ती कधीच दुसरं काम करायची नाही. झाऱ्याने तो रवा भाजताना रंग बदलायचा, घरात सगळीकडे वास पसरायचा. शिरा करायच्या आधीच तिने शेगडीजवळ पाणी, दुध, साखर, लवंग, काजू किसमिस ठेवलेली असायची, आयत्यावेळी गडबड नको म्हणून. रवा भाजतानाच तो अर्धवट भाजला गेला की त्यात लवंग, काजू किसमिस घालायची आणि त्याचवेळी शेजारच्या शेगडीवर ती पाण्याचे आधण चढवायची. गार पाण्यापेक्षा, गरम पाण्याने शिरा छान फुलून येतो म्हणायची. मग परफेक्ट भाजल्या गेलेल्या या रव्यात पाणी घालायची, हो पाणीच घालायची, अगदी शेवटी थोडासा दुधाचा शिपकारा मारायची. पाणी घातलं म्हणजे शिरा हलका होता, दुध घातलं तर गरम गरम खायलाच बरा असतो. मग रवा छान फुलून आला की त्यात साखर घालायची. शेवटी कडेने एक चमचा तूप सोडायची आणि गॅस बंद करायची. लहानपणापासून शिर्यामध्ये लवंग घालून खाल्लेली असल्याने नमिताला शिर्यामध्ये वेलदोड्याची चव बिलकुल आवडायची नाही. आत्तासुद्धा असाच लवंग घेतलेल्या शिऱ्याचा वास नाकात शिरला आणि दोन मिनिट ती तिथेच थांबली आणि एकदम उत्साहित होऊन लगेच ती आईला म्हणाली, आई अगदी तुझ्या शिऱ्यासारखा वास आला ग, आणि मला आत्ताच्या आत्ता शिरा खावासा वाटला. तसे तिला गोड फारसे आवडत नव्हते , आईचा हातचा हा शिरा खायची, पण या सात महिन्यात गोड बघितलं की मळमळतं या नावाखाली तिने आईला शिरा सुध्दा करू दिला नव्हता आणी आत्ता नमिताला सकाळी ७ वाजता शिरा खावासा वाटत होता.

‘वेडाबाई यालाच तर डोहाळे म्हणतात, तू काही इकडे येणार नाहीस बाळंतपणाला आता मीच तिकडे आले की करून खायला घालेन. ‘आई म्हणाली

त्या घरातून कोणीतरी बाहेर यावं आणि घे हा शिरा असं म्हणावं असं ती उगाचच मनातल्या मनात म्हणत होती. शेवटी रेंगाळण्याचाही कंटाळा येऊन ती तिच्या नेहेमीच्या रस्त्याने चालायला लागली होती. आई काय बोलत होती याकडे तिचे फारसे लक्षच नव्हतं. तिला डोळ्यापुढे जिभेवर फक्त तो शिराच दिसत होता, जाणवत होता. नेहेमीपेक्षा जरा झपझप पावलं टाकत ती बागेला वळसा घालून डावीकडे वळून त्या दुकानापाशी आली, आपणच करून बघावा शिरा असा बेत मनात करत तिने उगाचच त्या दुकानातून तुपाचे छोट पॅकेट घेतलं. नेहेमीच्या ओळखीतला असल्यामुळे तो दुकानदार पैसा बाद मै दे दो म्हणाला.

त्या पारिजातकाच्या झाडापाशी परत दोन क्षण रेंगाळली. पण आता वास येत नव्हता. शिरा होऊन डब्यात बंद पण झाला असावा. ती आता आपणच घरी जाऊन शिरा करूया म्हणत निघाली, तर त्या नेहेमी रांगोळी काढणाऱ्या मावशी ‘जरा थांबतेस का ग?’ म्हणाल्या. ‘अय्या तुम्हाला मराठी येतं कित्ती छान?’

‘ अर्थ होतो मला, पण बोलायला नीट नाही जमत, पूर्वी मुंबईत होतं तेव्हा चांगली यायची आता बोलायला कोणी नसते तर फर्गेतिंग होते.’

‘मावशी , मी इथेच या रोडवर ६४१ मध्ये राहते. या ना घरी.’

‘आय विल कम सम अदर टाईम. मे बी टू कलेक्ट धिस टिफिन.’

‘मावशी काय आहे त्यात? आणि माझ्याशी मराठीतच बोला, कसेही बोला, मला छान वाटेल.’

‘तुला केशरी भात खावासा वाटलं असं तुज्या आईला सांगत होती ना ते मी ऐकलं, पण तेव्हा रेडी नव्हता, आता डब्यात घालून तुजाच वाट पाहत होते मी. जास्ती कोटील्ला, थोडाच दिलाय, बट इफ यु लाईक धिस आय विल मेक मोर आणि परत देईन.’

दहा महिन्यात केशरी भात म्हणजे शिरा एवढं नक्कीच कळलं होतं. डोळ्यात पाणी आलं होतं. जसे जमेल तसं वाकून ती नमस्कार करत होती तेव्हाच केसात फुल माळलेल्या सुती साडीमधल्या, मोठ्ठ कुंकू लावलेल्या तिच्या या नव्या मावशीने तिच्या पाठीवर हात ठेवून तिला उचलत म्हणाली, ‘केशरी भात गरम आहे, बेगाच खाऊन घे.’

खाद्यपदार्थ नेहेमीच  भाषेची, संस्कृतीची दारे तोडून नवी नाती जोडत असतात.

डोळ्यात प्राजक्त फुलवत ती घराकडे निघाली, हातात शिऱ्याचा डबा होता, पण पोट भरलं होतं. शिरा खायच्या आधीच मन तृप्त झालं होतं. तरी घरी येऊन तिने हाताने एक घास तोंडात घातला आणि डोळे मिटले, थेट माहेरच्या घरी गेली ती. पोटातल्या लाथेने परत बंगलोर मध्ये आली. आईला काही सांगायच्या ऐवजी शिऱ्याच्या डब्यासोबत सेल्फी घेऊन तिने तो फॅमिली ग्रुपवर टाकला आणि दिवसा शांत पडून राहणाऱ्या बाळाला लाथा मारण्याचं निमित्त द्यायला ती एकटीच डोळे मिटून शिरा खात बसली.

 

Shira

Manasi Holehonnur is a member of the Angat Pangat Facebook Group.

 

4 Comments
  1. अपेक्षित शेवट होता, पण कथेतली गंमत त्या शिऱ्याच्या पाककृतीत आहे. आता शिरा करायलाच हवा लवकर.

Leave a Reply

Your email address will not be published.