मराठमोळी खाद्यदिंडी

सुमारे वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी लग्न होऊन सिंगापूरला आले तेव्हा इथे आपल्यासमोर “काय वाढून ठेवलंय” याची सुतराम कल्पना नव्हती. त्यापूर्वी पुण्यात आयुष्य काढलेल्या, माझ्यासारख्या मुलीपुढे, परक्या अनोळखी देशात कायमचे वास्तव्य करणे, इथल्या मातीत आपले देशी संस्कार रुजवणे हे मोठे आव्हान होते. आणि ते किती अवघड आहे याची प्रचिती पहिल्याच दिवशी आली.

पहिल्या दिवशी किराणा सामान खरेदीसाठी गेलो तेव्हा कळले की तेव्हा इथे डाळी, तांदूळ, आटा, बेसन, साखर,गूळ सोडून फारसे काही मिळत नाही. तेव्हा दाणे, साबुदाणा, भाजाणी, ज्वारी बाजरीचे पीठ, आमसूल, वऱ्याचे तांदूळ, कुरडया पापड्या असे प्रकार मिळायचे नाहीत. आपले मसाले लोणची तर दूरच! ते सगळे भारतातून येताना सामानाच्या वजनात बसतील तेवढे आणायचे आणि पुरवायचे असा प्रकार होता. तेंव्हा भारतातून परत येतानाचे आमचे सामान जणू आईचे पूर्ण घर बॅगेत पॅक केल्यासारखे अवाढव्य असायचे. जास्त व्हरायटी आणता यावी म्हणून सगळे थोडे थोडे आणायचे.

त्यामुळे साबुदाण्याची खिचडी महिन्यातून एकदा चतुर्थीच्या उपासाला व्हायची. थालिपीठं, भाकरी आलटून पालटून एकेका महिन्यात! भारतातून कोणी पाहुणे येणार असले की त्यांना ऑर्डर पीठांची असायची.

माझी पहिली मंगळागौर आम्ही घरीच केली होती. नशिबाने ५ मैत्रिणी पूजेला मिळाल्या! झोकात पूजा झाली. त्यानंतर केळीच्या पानावर वरणभात, मसालेभात, पुरणपोळी, कटाची आमटी, बटाटा भाजी कोशिंबीर अश्या जेवणाची पंगत पाहून बाकीच्या मैत्रिणींना इतका आनंद झाला! तेव्हा सिंगापुरात आयती पुरणपोळी म्हणजे पर्वणी होती!

त्यानंतर आला गणेशोत्सव! आमच्याकडे सव्वा महिना गणपती असतो. दसऱ्याला विसर्जन होते. त्यामुळे गणपतीच्या दिवसात ३-४ वेळा तरी उकडीचे मोदक होतात. तेव्हा इथे मोदकांची पीठी मिळायची नाही. जे पीठ मिळायचे त्याचे मोदक करणे म्हणजे कोरड्या वाळूचा किल्ला करण्यासारखे कठीण! इथे चायनीज लोक “पाऊ” नावाचा प्रकार खातात. दिसायला अगदी मोदक पण आत चिकनचे सारण भरलेला. तो बनवायला “ग्लुटेनियस राईस फ्लोअर” वापरतात. तो आणून पाहिला..तर हाय रे माझ्या कर्मा! त्याची उकड काढली तर ती, पुलंच्या माझे पौष्टिक जीवनमधल्या पोस्टातल्या खळीसारखी झाली. ती खळ जशी पत्रापेक्षा धोतराला चिकटायची तशी ही उकड पातेल्यालाच चिकटून बसली. मग शेवटी पहिल्या वरा तूच बरा म्हणत आधीची पीठी वापरून त्यात थोडा मैदा मिसळून मोदक केले. त्यांना लाडू म्हणावे की मोदक असा संभ्रम होता पण बाप्पाने सेवा गोड मानून घेतली असावी! त्यानंतर कित्येक वर्षे “आपल्याला सुंदर मोदक कधी जमणारच नाहीत अशी माझी ठाम समजूत होती.

एक गोष्ट बरी होती की आपल्या गोष्टी फारश्या मिळत नसल्याने सर्व घरीच करायची सवय लागली.आणि ज्या सहज मिळणाऱ्या वस्तू दुर्लभ होतात त्यांची किंमतही कळली. बाहेर मिळणाऱ्या वस्तू जितक्या कमी तितके जिद्दीने आपले पदार्थ घरी करायची सवय लागली. भाजाणी नाही तर कणिक बेसन आणि तांदुळाच्या पीठाचे थालीपीठ, चायनीज पालकाची पातळभाजी, मुरक्कुच्या पिठात आपली बाकी पिठे मिसळून चकल्या, मिल्क पावडरचे पेढे, खव्या ऐवजी कंडेन्सड मिल्क वापरून गाजर किंवा दुधी हलवा, मिल्क पावडरचे गुलाबजाम असे प्रकार करत निदान आपल्या घरापुरती आपली खाद्य संस्कृती जागी ठेवायचा प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवला.

दिवाळीला मिळेल त्या सामानातून करंज्या, लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळे सर्व घरी करण्यात खूप आनंद मिळायचा. जणू भारतातला दिवाळीचा माहोल निदान आपल्या घराच्या चार भिंतीआड का होईना तयार करता यायचा.

माझ्या शेजारी चायनीज शेजारीण राहायची. ती बौद्ध असल्याने शाकाहारी होती. तिला जातायेता आमच्या घरातून येणारे पदार्थांचे वास खूप आवडायचे. मग तिला अधून मधून आमटी किंवा साधी फोडणीची  एखादी भाजी पाठवायची मी. तिला फोडणीचे वरण तर इतके आवडले की माझ्याकडून शिकून घेतले तिने!

मी इथे दर वर्षी संक्रांतीचे हळदीकुंकू, चैत्रगौर, श्रावणी, नागपंचमी, शुक्रवारी सवाष्ण, आश्विनी पौर्णिमा, दसरा दिवाळी सर्व काही उत्साहाने साजरे करते. संक्रांतीच्या हळदीकुंकवाला २०-२५ मराठी अमराठी मैत्रिणी येतात. त्यांच्यासाठी तिळगूळ, २-३ पदार्थांची पोटभरू डिश सर्व घरी करते. मागच्या वर्षी रवा नारळ लाडू, मसालेभात, मिसळ आणि सोलकढी अशी मराठमोळी डिश भाव खाऊन गेली होती. अमराठी मैत्रिणी सोलकढीच्या प्रेमात पडल्या.

इतकेच नव्हे तर माझ्या मुलाची मुंज देखील इथे केली आम्ही. १५० लोकांनी जिलेबी, मठ्ठा, अळूची भाजी मसालेभात, वरणभात, भाजी, चटणी कोशिंबीर,पापड कुरडया, भजी अश्या पुणेरी कार्यालयातल्या मेनूचा पंगतीत बसून आनंद घेतला.

साधारण दहाएक वर्षांपासून परिस्थितीत बदल झाला. इथे एका गृहस्थांनी मिनी चितळे दुकान उघडले, महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट सुरू केले.आता आपली सर्व पिठे, चटण्या, लोणची, पापड, चितळे मिठाई, बाकरवडी सर्वकाही मिळते. अगदी ताजी पालक मेथी, अळूची पाने वगैरे सर्व काही मिळते. त्यामुळे अवाढव्य बॅग्जची गरज पडत नाही. तरी माहेरून परत येताना घरची हळद, तिखट, मसाला, साजूक तूप, भाजाण्या अशी मायेची शिदोरी असतेच. त्यामुळे सामानाच्या बॅग्स विमानतळावर वजन करताना थोडी धाकधूक असतेच! न जाणो, सामानाचे वजन जास्त आहे असे म्हणून त्यांनी कुठल्या वस्तू काढायला लावल्या तर?

आता चांगल्या प्रतीची पिठे वगैरे मिळू लागल्याने उकडीच्या मोदकांची तब्येत सुधारत चाललीय. त्यांच्या मुखऱ्या पाहून कोणी नाक मुरडत नाही. मुरडीच्या करंज्या, तिरंगी चिरोटे, टम्म फुगलेल्या भाकऱ्या अश्या अप्राप्य गोष्टी आता सहज शक्य वाटू लागल्यात. तर असा हा आपली खाद्यदिंडी सिंगापुरात आणायचा प्रवास खडतर होता खरा पण आता मार्ग सुकर झाला आहे. आता फक्त मार्गक्रमणा चालू ठेवायची. अशी ही पुण्याहून निघालेली मराठमोळी  खाद्यदिंडी सिंगापुरी सुफळ संपूर्ण!

 

Vinaya Raydurg is a member of the Angat Pangat Facebook Group.

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.