पेरुचं पंचामृत

Peru Panchamrut

माझ्या वडलांचं मूळ गाव नाशिक. त्यांचा जन्म तिथलाच. उच्च शिक्षण आणि नोकरीनिमित्त ते मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले. पण त्यांचं सगळं कुटुंब अजूनही नाशकातच आहे. मी लहान असताना कधी उन्हाळी तर कधी गणपतीच्या आणि कधीकधी नाताळच्या सुट्टीत आम्ही नाशिकला जात असू. नाशिकच्या कॉलेज रोडवर काकांचा बंगला आहे. उन्हाळ्यात गेलो की आम्ही बच्चे कंपनी सगळे गच्चीवर जायचो झोपायला. चांदणं पडलेलं निरभ्र आभाळ न्याहाळता न्याहाळता कधी झोप लागायची कळायचंच नाही. पण हिवाळ्यात गेलो की नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत गच्चीत झोपायला मोठ्यांचा मज्जाव असायचा. पण हिवाळ्यातही वेगळीच मज्जा असायची.

माझ्या आजीला झाडं लावण्याची, बागकामाची खुप आवड होती. काकांच्या बंगल्याच्या आजूबाजूला तिने भरपूर झाडं लावली होती. एखाद्या फ़ळाचं बी किंवा कुठलसं मूळ किंवा इवलंस रोपटं जरी हाती लागलं की आजी लगेच परसात जाऊन ते मातीत लावून टाकायची. आंबा खायला छान गोड लागला, लाव त्याची कोय मातीत. शेवग्याच्या शेंगा, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, आंबे, पेरु, लिंबं अशी असंख्य झाडं तिनी लावलेली. आणि फ़ुलझाडांची तर गणतीच नव्हती. जास्वंद, मोगरा, सदाफ़ुली, रातराणी… बाग कायम फ़ुललेली असायची. आजीला झेपत होतं तोपर्यंत रोज सकाळी लवकर उठून ती सगळी बाग, परसदार खराट्याने झाडून काढायची. मग एकजात सगळ्या झाडांना पाणी घालायची. अंगणात पाणी शिंपडायची. ओसरीजवळ ।।श्री राम प्रसन्न ।। आणि कासवाची रांगोळी काढायची. खूप प्रसन्न वाटायचं.

हिवाळ्यात पेरुचं झाड पेरुंनी डवरलेलं असायचं. मस्त तिखट मीठ मसाला लावलेल्या पेरुंच्या फ़ोडींवर सगळी बच्चे कंपनी तुटुन पडायची. मला मात्र पेरु नुसताच आवडायचा. तिखट मीठामुळे त्याचा मूळ गोड गुणधर्म नष्ट करायला मला अजिबात आवडायचं नाही. अजूनही आवडत नाही. भरपूर पेरु खाऊनही झाडावरचे  पेरु संपायचेच नाहीत. वाटायचं हे झाड जादूचं तर नाही ना? कितीही खा, पेरुंची गणती कायम अगणितच. मग आजी कधी पेरुचं पंचामृत करायची तर कधी पेरुची कोशिंबीर. दोन्ही चवीला उत्कृष्ट. त्यातल्या त्यात आजीने केलेलं पेरुचं पंचामृत म्हणजे माझ्या वडलांचा जीव का प्राण. आजही ते पेरुच्या त्या पंचामृताची आठवण काढतात आणि मी कितीही चांगलं बनवलं तरी आक्कासारखं (माझ्या आजीला ही सगळी भावंडं आक्का म्हणायचे) नाही जमलं असंच म्हणतात. असो. शेवटी आई ती आईच. तिच्या हाताची सर इतर कुणाच्या हाताला कशी येणार नाही का?

आज त्याच पेरुच्या पंचामृताची रेसिपी शेअर करते आहे.  पूर्वी सणासुदीला किंवा लग्न कार्यांमध्ये महाराष्ट्रीय जेवणात डाव्या बाजूला कोशिंबीर, रायत्यांबरोबर, दह्यात कालवलेलं मेतकूट आणि पंचामृत असायचंच. पंचामृत हे एक आंबट, तिखट, गोड असं तोंडीलावणं आहे. त्यात पेरु घातला की पेरुची छान चव लागते त्यात. हल्ली मुळी लग्नकार्यात पारंपारिक जेवण ठेवण्याचा प्रघातच लोप पावत चाललाय. शिवाय हल्ली महिलाही मोठय़ा संख्येने नोकरी करीत असल्याने बाहेर जेवणाकडे कल वाढलाय. घरी असले पारंपारिक पदार्थ करुन घरच्यांना खाऊ घालण्याची उस्तवारी करण्याची सवड नसते. त्यामुळे, काळाच्या ओघात पंचामृतासारखे पदार्थ लोप पावत चालले आहेत. हॉटेलांत पंजाबी, मुगलाई, उडुपी जेवण हमखास मिळते. आताशा मराठी जेवणही मिळू लागले आहे. पण फ़ार कमी महाराष्ट्रीय हॉटेल्सच्या मेनु कार्डवर पंचामृत पहायला मिळतं. जागतिकीकरणाच्या रेटय़ात आपला पारंपारिक ज्ञातीय वारसा टिकवला नाही तर पुढच्या पिढीला त्याची तोंडओळखही राहणार नाही. ही बाब विचारात घेऊन तरी आपण हे पारंपारिक पदार्थ आपल्या लेकरांना खाऊ घालायला हवेत असं मला अगदी मनापासून वाटतं. काय तर मग? करुन बघाल ना पेरुचं पंचामृत?

Peru Panchamrut in a Thali

पेरुचं पंचामृत

साहित्य –

 • एक मोठा पेरू (पेरु मध्यम पिकलेला असावा. फ़ार कच्चा किंवा फ़ार पिकलेला नसावा. जास्त पिकलेला असला की शिजल्यावर लगदा होतो.
 • शेंगदाणे – पाव वाटी
 • तीळ – पाव वाटी
 • पाव वाटी चिंचेचा कोळ,
  फ़ोडणीसाठी तेल
 • मोहरी – 1 टीस्पून
 • जिरं  – ½ टीस्पून
 • मेथीचे दाणे – 2-3
 • हिंग – चिमूटभर
 • हिरव्या मिरच्या – 2
 • कडीपत्त्याची पानं – 7/8
 • काजू तुकडा – 10-15
 • हळद – ¼ टीस्पून
 • लाल मिरची पावडर (तिखट) – 1 टीस्पून
  एक चमचा गोडा मसाला
 • गुळ – मोठा खडा
 • मीठ चवीनुसार

कृती –

 1. प्रथम शेंगदाणे आणि तीळ मंद आचेवर वेगवेगळं खमंग भाजून घ्यावेत. जरा गार करुन त्यांचं कुट करुन घ्यावं.
 2. पेरू धुवून मध्ये चिरुन घ्यावा. शक्य तितक्या बिया सुरीच्या सहाय्याने कोरुन काढाव्यात. थोड्या बिया राहिल्या तरी हरकत नाही. आता पेरूच्या सालासकट छोट्या चौकोनी फोडी करून घ्याव्यात.
 3. एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरं आणि मेथीचे दाणे घालावेत. मोहरी तडतडली की त्यात प्रथम काजूचे तुकडे घालून ते सोनेरी रंगाचे होईस्तोवर परतून घ्यावे. मग त्यात हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कडीपत्ता घालावा.
 4. आता त्यात पेरूच्या फोडी घालून परतून घ्यावे आणि झाकण ठेवून एक वाफ़ आणावी. फ़क्त दोनच मिनिटं. कारण पेरु पटकन शिजतो. आपल्याला पेरुचा करकरीतपणा पंचामृत खाताना जाणवायला हवा. त्यामुळे, तुमचा पेरु किती पिकलेला आहे त्यानुसार किती शिजवायचं ते ठरवता येईल. कच्चा असेल तर दोन मिनिटं वाफ़ काढणं पुरेसं आहे. पण पेरु चांगला पिकलेला असेल तर वाफ़ काढण्याची आवश्यकता नाही.
 5. आता त्यात हळद, तिखट आणि गोडा मसाला घालावा. तीळ आणि दाण्याचं कुट घालून चांगलं परतून घ्यावं. चिंचेचा कोळ आणि साधारण 1 वाटी पाणी घालावं. मीठ आणि गुळ घालून हे मिश्रण 10-15 मिनिटं उकळू द्यावं. घट्ट हवं असल्यास जास्त वेळ उकळी काढावी. अति घट्ट वाटत असल्यास गरजेनुसार पाणी घालून उकळी काढावी.

 

टीप – पंचामृतात खोबऱ्याचे काप सुध्दा घालतात. पण आमच्याकडे जेष्ठ नागरिकांना खोबऱ्याचे काप चावायला त्रास होतो म्हणून मी वगळले आहेत. इच्छा असल्यास घालावेत. फ़ोडणीत काजूबरोबर तांबूस सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यावेत

 

Sonal Jambekar is a member of the Angat Pangat Facebook Group.

 

1 Comment
 1. पंचामृत फार आवडायचं लहान असताना. पण हल्ली केलंच नाहीये अनेक वर्षांत. आता पेरू येऊ लागलेत, करेन नक्की. आमच्याकडे पेरूचं लोणचं होतं नेहमी, म्हणजे आपण मेथांबा करतो तसं. पण पंचामृताची गंमत वेगळीच.

Leave a Reply

Your email address will not be published.