तबकडीच्या तालावर

आई ई ई ई ….. अग दुध उतू गेलं … लेकाने  पुकारा केला तसा पटकन फोन बंद केला आणि धावत स्वयंपाकघरात गेले. काळ्या ग्रॅनाइटवरून सिंककडे दुधाची गंगा वाहत होती. पातेल्याच्या काठावर सायीचे तोरण लटकत होते…ग्यासवरचे  दुधाचे पातेले रागाने लालेलाल झाले होते. आणि निळ्या ज्वाळा विजयी मुद्रेने झळाळत होत्या. मी हताश होवून या दृश्याकडे  बघत होते, तोच पुकारा झाला, “अग, चहा झाला की नाही अजून? मला बाहेर जायचं आहे.” मी दचकलेच. बाजूच्या शेगडीवर चहाच आधण  उकळून उकळून केंव्हाच हवेत विरलं होतं. घाईघाईने  त्यात कपभर पाणी टाकलं, तसं भांड्याने तडतडून गरम पाण्याचे चटके हाताला दिले आणि आपला निषेध व्यक्त केला. मग हळूच दुधाच्या भांड्यात डोकावलं. ह्यांच्या पुरता तरी चहा होईल इतकं दुध तळाला आहे हे बघून माझा जीव भांड्यात पडला. चहाचा पाहिलं घोट घेताच ह्यांनी नाक मुरडलं….”दुध लागलं वाटत!” 

कस सांगू काय अडचण आहे… कोण ठेवेल  विश्वास माझ्यावर? छे शक्यच नाही. हसाल तुम्ही मला. पण काय करू, खरच  गॅसवर स्वयंपाक करायची सवयच गेली आहे हो. पंधरा वर्षापूर्वी पर्यंत  याच गॅसवर स्वयंपाक करत होते. मग आता असं काय होतंय??

पंधरा वर्षापूर्वी दुबईला गेले. पहिल्यांदाच मातृभूमी सोडून गेले. विमानतळावर उतरले आणि इतकं सुंदर, अगदी आत्ता धुऊन पुसून स्वच्छ  केल्यासारखं हे शहर मला खूपच आवडलं होतं. ह्यांना दुबईला नोकरीवर रुजू होऊन चार महिने झाले होते. घरी पोचल्याबरोबर ह्यांनी फर्मान सोडलं, “खूप दिवस झाले तुझ्या हाताचा चहा पिऊन. पटकन एक कप फक्कड चहा दे. मला परत ऑफिसला जायचं आहे.” चकचकीत स्वयंपाकघर बघून मी पण सुखावले होते. चार महिन्यांनी नवऱ्याला आपल्या हातचा चहा करून देण्यासाठी आनंदाने सरसावले. ओट्याखालच्या कपाटातून चहाचे भांडे काढले आणि ग्यास वर ठेवायला गेले …पण … पण इथे तर ग्यास नव्हताच. चहाच भांड हातात तसंच धरून मी बावचळून तशीच उभी राहिले. 

गॅसच्या बर्नरच्या जागी नुसती तबकडी. अगदी जुन्या एचएमव्ही च्या रेकॉर्ड्स सारखीच. बटण चालू केला तर ही गरागरा फिरेल आणि यावर गाणं वाजेल असं वाटावं. पण पिन मात्र कुठे दिसेना… आता या तबकडीवर चहा कसा काय करायचा, हे कोड उगडेना? हे स्वयपाकघरात आले. माझ्या बावचळलेल्या चेहऱ्यावर माझं अज्ञान इतकं स्पष्ट होतं की यांना वेगळं काही सांगावच लागलं नाही. मग ही हॉट प्लेटची तबकडी कशी वापरायची याच प्रात्यक्षिक म्हणून यांनीच चहा केला. ते बघूनचं माझ्या घश्याला कोरड पडली. यांनी केलेल्या  चहाचे दोन घोट  माझ्या घशात गेले तेंव्हा जरा जीवात जीव आला. हे ऑफिसला निघून गेले. मी जरा हात पाय धुवून संपूर्ण घराचा फेरफटका मारला. बाकी घर एकदम झक्कास होतं. कुठे म्हणून नाव ठेवायला जागा नव्हती. मोठ्या खोल्या, भरपूर कपाट, झुळझुळीत पडदे, नक्षीदार झुंबरसगळ्या खोल्यांमध्ये भरपूर उजेड … सगळ्या सुख सोयीनी सज्ज घर मला तर खूपच आवडलं. घरभर फिरून परत स्वयपाकघरात आले.

आता रोज सकाळ संध्याकाळ या तबकडीच्या तालावरचं आपल्याला नाचायचं आहे  या कल्पनेनी छातीत धस्स झालं. या लोकांना साधी गॅसची शेगडी माहित नसावी, की आवडत नसावी? हा तर पेट्रोलियम पदार्थांचा देश मग यांना गॅसचं काय वावड? माझं इतिहास, भूगोल, विज्ञान … सगळ्या विषयांच ज्ञान पणाला लावलं पण उत्तर मिळालं नाही. शेवटी आलिया भोगासी … म्हणत या तबकडीच्या तालाशी आपले सूर जुळवून घेण्यावाचून गत्यंतर नाही हे सत्य पचवून कामाला लागले. भारतातून आणलेले अस्सल घरचे मसाले, पापड, आणि पीठ काढून कपाटात ठेवली. फ्रीज उघडून बघितलं. ह्यांनी भरपूर भाजीपाला दुध दही वगैरे आणून फ्रीज भरून ठेवला होता. रात्रीचा स्वयंपाक  जरा लवकरच करावा असं ठरवून संध्याकाळीच कामाला लागले. भाजी चिरली, डाळ-तांदूळ धुतले. मनात म्हणलं, नेहमीसारख एकीकडे भाजी फोडणीला टाकावी  आणि बाजूला  दुसरया गॅस वर …. गॅस नाही तबकडीवर ….कुकर लावावा. बटण फिरवलं. भारतात ग्यास ला लो‘  आणि हायअसे दोनच पर्याय असतात पण इथे मात्र सहा पर्याय होते.

१ म्हणजे अगदी मंद आणि सहा म्हणजे एकदम हाय.  एक तबकडी हायवर  ठेवली, त्यावर कुकर ठेवला. दुसरीकडे भाजी टाकायला कढई ठेवावी म्हणलं  तर सगळी कपाट  धुंडाळून झाली पण कढई  सापडेना. ओट्याखालच्या कपाटात  सुंदर लाल रंगाची मोठी मोठी भांडी होती. सगळी भांडी निर्लेपची  … बापरे किती महाग भाडी असतील ही? मुंबईला माझ्याकडे फक्त एक तवा निर्लेपचा होता. तो मी पुरणपोळी करताना काढत असे. एरवी तो मलमलच्या कपड्यात गुंडाळून अगदी खालच्या खणात मागे ठेवलेला असे. त्यावर एक सुद्धा ओरखडा येत कामा नये याची कित्ती काळजी मी घेत होते. आणि इथे तर रोजच्या स्वयंपाकाकरता ही भांडी वापरायची म्हणजे पदार्थच्या चवीपेक्षा मला भांड्याचीच काळजी जास्ती घ्यावी लागणार याची नोंद नकळत घेतल्या गेली.  निरुपाय होवून त्यातलं एक भांड भाजी करायला घेतलं. आणि त्या हॉट प्लेट नामक तबकडीवर ठेवलं. ही मात्र जास्ती गरम व्हायला नको म्हणून २ नंबर वर ठेवलं.  दुसरीकडे प्रेशर कुकर लावला. फोडणीसाठी भांड्यात तेल टाकलं. ते गरम होण्याची वाट पहात बसले. आणि मन एकदम चाळीस वर्ष मागे गेलं. आमच्या लहानपणी मागच्या अंगणात अंग्होळीच्या पाण्यासाठी आजी चुल पेटवायची. त्यावर ठेवलेलं मोठं जुनं पितळी पातेल्यात  सतत पाणी उकळत असायचं. पाणी काढुन घेतलं की चुलीतली लाकडं पुढे सरकवायची हा प्रत्येकासाठी नियम. आत स्पयंपाकाला गॅसची शेगडी होती पण पोळ्या करायला येणार्‍या बाईंना गॅसची सवय नव्हती. पण त्यांना बहुदा कमाची गरक असावी म्हणून आजीने त्यांना कामावर ठेवलं असावं. त्या बाई, कोळसे आणुन ते फोडुन ठेवण्यापसुन सर्व काम करत. त्या पोळ्या शेगडीवर करत असतं. त्यांनी शेगडी पेटवली की आम्ही त्यात कधी बटाटा, कधी रताळं, टाकायचो. मस्त खरपुस भाजलेलं हे रताळं किंवा बटाटा मीठ लावुन असला मस्त लागायचा नं… बटाटा… अरे बापरे, कढई तापली असेल.. कापलेले बटाटे काळपट व्हायला लागले होते. एक्दम भानावर आले. तेलात हिंग मोहोरी टाकली. पण तेल गारच. कढईला हात लावून पाहिला. ती जेमतेम कोमट झालेलं. तेव्हढ्यात यांचा फोन आला. मी स्वयंपाक  करते आहे हे ऐकून येणाऱ्या अडचणींचा बहुदा त्यांना अंदाज असावा. तेंव्हा हा काही तुझा गॅस नाही, ही प्लेट गरम व्हायला जरा वेळ लागतो तुला याची सवय व्हायला वेळ लागेलहा मोलाचा संदेश यांनी मला दिला तेंव्हा माझं काही चुकलं नाही हे जाणून माझा जीव भांड्यात पडला. कढई मग हायवर ठेवली आणि  मी निर्धास्त होवून कणिक भिजवायला घेतली. कणिक तिंबता तिंबता पुन्हा मन भुतकाळात शिरलं. पुर्वी घरी दोन –दोन सिलेंडर्स नसायचे. एकच सिलेंडर, तो ही नंबर लावला ही दहा-पंधरा दिवसांनी मिळायचा. त्यामुळे गॅस संपला की माळ्यावरचा स्तोव्ह खाली यायचा. एक वातीचा स्तोव्ह आणि दुसरा आकड्याचा स्टोव्ह. दारा मागे कोपर्‍यात रॉकेलचा डबा सज्ज व्हायचा. वाती रॉकेल मधे भिजवुन त्या स्टोव्ह मधे लावाव्या लागायच्या. त्या बरोबर हव्या तेवढ्याच वर यायला हव्यात नाहीतर ज्योत लाल होते आणि भांड्याला काजळी धरते हे ज्ञान आपोआपच मिळालं होतं. दुसरा आकड्याचा स्तोव्ह मला फारसा आवडायचा नाही. फार आवाज करतो. वातीचा स्टोव्ह दिसायला तसा सुमार पण अगदी सुशील, सुगरण शांत संयमी गृहिणीचं प्रतिक, आणि हा आकड्याचा स्टोव्ह दिसायला पितळेचा चकचकीत, पण नाक मुरडत, नखाचं नेलपेंट सांभाळत, उगाच टेंभा मिरवत स्वयंपाक कराणार्‍या नवख्या नवरीचं प्रतिक असं मला उगाच वाटायचं.

पण एकदा नवीन सिलेंडर आलं की पुन्हा या दोघींची रवानगी माळ्यावर झाली की अगदी हुश्श व्हायचं. कणिक तिंबताना किती वर्ष मागे फिरुन आले.. मगाशी कढईत टाकलेली मोहरी तडतडून उठली. आणि मी पुन्हा वर्तमानात तबकडीपाशी आले.. मोहरी तडतडली म्हणुन हळद तिखट ताकायला हात धुऊन साडीला पुसते तोवर सगळी फोडणी जळुन गेली. पटकन बटण बंद केलं पण ही लालेलाल झालेली तबकडी शांत होण्याची लक्षणे दिसेनात. शेवटी पटकन ती कढईच तिथून उचलून बाजूला ठेवली. लाल लाल भांड्यांना काळे  गरम न होणारे कान लावणाऱ्या हुशार संशोधकाच मला प्रचंड कौतुक वाटलं. माझ्यासारख्या वेंधळ्या गृहिणींना डोळ्यासमोर ठेवूनच  या भांड्यांच  डिझाइन  बनवलं असणार. कढई गार झाल्यावर ती धुतली, पुसली आणि परत त्यात तेल टाकून पुन्हा प्लेट वर ठेवली. पण ती कढई गार करण्याचा नादात ती प्लेट पण गार झाली होती. परत बटण फिरवलं आणि प्लेट गरम होण्याची वाट पहात बसले. पण या वेळी मात्र कटाक्षाने त्यावर लक्ष ठेवून होते. यथावकाश कढई गरम झाली मग त्यात तेल टाकून फोडणी केली. आणि भाजी टाकली. कमी उष्णता हवी असेल तेंव्हा भांड प्लेट वरून उचलायच हा नवीन मंत्र पहिल्या दिवशीच मिळला. भाजी वर झाकण ठेवून जरा दम घेते म्हणलं तर कुकरने पहिली शिट्टी दिली. चला, वरण भाताच  तंत्र तरी तेच आहे, याची पावती मिळाली. तीन शिट्या झाल्यावर बटण बंद केलं. भाजी एकदा परतून पुन्हा झाकण ठेवलं आणि मगाशी  अर्धवट भिजवलेली कणिक   नीट तिंबून झाकून ठेवली. आता हे आले की गरम फुलके करावेत आणि वरणाला फोडणी घालावी असा विचार करून बाहेर बाल्कनीमधे जाऊन बसले. खुर्चीत टेकते न टेकते तोच पुन्हा कुकरची शिट्टी वाजली. बहुदा हॉट प्लेटचं बटण नीट बंद केलं नसावं असं वाटलं  म्हणून स्वयंपाक घरात गेले आणि खात्री करून पुन्हा बाहेर आले. पण कुकरच्या शिट्ट्या काही थांबेनात. तेंव्हा इथे नुसत बटण बंद करून भागत नाही तर कुकर उचलून बाजूला ठेवायला हवा हा आणखीन एक धडा मिळला. ही हॉट प्लेट  म्हणजे शेजारच्या सुमी सारखी होती. गाणं गायला  सांगितलं की आधी खूप आढेवेढे घ्यायचे पण एकदा सुरवात केली की थांबायचं नाव नाही! तश्या ७-८ शिट्ट्या देवून तबकडी आणि कुकर दोन्ही थंडावले. असो, पहिल्या दिवशी  भाजी आणि वरण भात शिजवण्यात आपण यशस्वी ठरलो ..हे ही नसे थोडके असं म्हणून फुलके करायला सुरवात करावी म्हणून पोळपाट लाटणं  काढलं. इतका सुरेख नवीन कोरा निर्लेपचा तवा पोळ्यांना वापरायचा खरं तर जीवावर आलं होतं पण इथे साधा लोखंडी तवा असण्याची शक्यता नसल्यामुळे तोच तवा प्लेट वर ठेवून पुन्हा बटण दाबलं. पोळी लाटून झाली तरी तवा गरम होण्याची लक्षणं दिसेना. आणि एकदम बत्ती पेटली… फुलका फुलवू कुठे? आणि कसा? या तबकडी वर फुलका ठेवण्याची माझी तरी हिम्मत होत नव्हती. शेवटी लाटलेल्या पोळीचा पुन्हा गोळा केलं आणि तेल लावून घडीच्या पोळ्या लाटल्या. 

एव्हढासा  तो दोघांचा स्वयपाक एरवी चुटकीसरशी व्हायचा तो करता करता आज दहा जणांचा स्वयंपाक केल्या सारखी दमणूक झाली होती. भात जरा गुरगुट्या झालं आणि पोळ्या थोड्या करपल्या पण मसाले आणि करणारे हात नेहमीच्या सवयीचे होते त्यामुळे बरेच दिवसांनी घरच जेवण मिळाल्याने हे पण खुश झाले. 

हळु हळु या हॉट प्लेटची सवय झाली. फुलके इतिहासजमा झाले. पहिल्या शिट्टी नंतर प्लेट बंद करण्याची सवय नकळत हाताला लागली. हॉट प्लेट गरम आणि गार होण्याच तंत्र अंगवळणी पडलं. आज ज्या स्वयंपाकाला एक तास लागतो तो पूर्वी कधी २०-२५ मिनिटात होत होता हे सत्य विस्मृतीत गेलं. आणि हीच स्वतःच्या तालावर नाचवणारी तबकडी आता माझ्या बोटांच्या इशार्‍यावर नाचू लागली. 

पंधरा वर्ष कशी गेली कळलंच नाही. भारतात परत येण्याचा निर्णय घेतला तेंव्हा मन  पुन्हा भूतकाळात गेलं. परत पूर्वीच्या अनेक आठवणींनी भरून आलं. आपल्या लोकांच्या सहवासासाठी आसुसलं. 

परत आले. माझं तेच जुनं स्वयंपाकघर… माहेरी आल्यासारखा प्रेमाचा ओलावा इथं जाणवला. पांढरी बिन-कानाची कढई बघून हरवलेली जुनी सखी पुन्हा भेटावी तसा आनंद झाला. प्रेमाने तिला कुरवाळली. कपाटातून मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवलेला निर्लेपचा तवा बघून जरा हसूच आलं. सासुबांची पितळी भांडी, बिडाचा तवा, दगडी खलबत्ता, बघुन त्यातल्या निर्व्याज्य प्रेमाचा मनावर शिड्कावा झाल्यासारखं वाटलं. खरचं, अंगाला काहीही लावुन न घेण्याचा गुण अंगी बाळगलेली ही ‘निर्लेप’ भांडी. आपल्या जुन्या साध्या भांड्यांमधली स्निग्धता तिकडच्या त्यांच्यात  कशी येणार?… हे संगमरवरी पोळपाट, आईनी जबलपुरहुन आणलं होतं, इतक ओझं प्रवासात वागवत माझ्यासाठी आणलं… आईवरच्या प्रेमाचा गहिवर उतु जाणार इतक्यात गॅसकडे नजर गेली.

अग बाई, काहीतरी करपलं  वाटत. अरे राम! भाजी लागली बहुतेक. आत्ता तर परतून आले होते. गॅस मंद ठेवला होता. किती बाई लक्ष ठेवाव लागत या गॅसकडे. ती हॉट प्लेट बरी होती. एकदा भाजी फोडणीला टाकावी आणि फेसबुक वर जाऊन बसावं. स्वयंपाक आणि गप्पा दोन्ही किती मस्त होत होत्या.

माझ्या मनातला विचार  जणू चेहऱ्यावर उमटला. टेबलावर ताटं मांडत हे हसून म्हणाले, अग ही काही हॉट प्लेट नाही…आता गॅसची सवय करायलाचं पाहिजे!

 

Vasudha Kulkarni is a member of the Angat Pangat Facebook Group.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.