गोष्ट एका चपातीची

सावंतवाडीतील एक शांत संध्याकाळ .. .दिवेलागणीची वेळ .. .रातकिड्यांची किरकिर सुरू झाली असेल .. “सोनु तुळशीसमोर दिवा आणि उदबत्ती लाव गंआईने मला घाक मारुन सांगितल आणि पुन्हा घरी आलेल्या पाहुण्यांशी बोलण्यात गुंतुन गेली.मी पण जराही वेळ घालवतां तुळशीपाशी दिवा लावला आणि लागलीच सटकले समोरच्या काकूंकडे चपाती खायला.. समोरच्या काकुंच्या स्वयंपाक घराचं दार पण आमच्या अंगणाच्या समोरच होतं.म्हणजे आमच्या अंगणाचं कुंपण त्या पुढे छोटीशी पायवाट आणि समोरच काकुंचं स्वयंपाकघर !

तर मी सटकले समोरच्या काकूंकडे चपाती खायला..हो काहीतरी खासच असायची त्यांची चपाती !! विद्याताई छान घडीच्या चपात्या लाटायची आणि काकू ,बहुतेक छोट्या राॅकेलच्या स्टोव्हवर चपात्या भाजायच्या

मी गेले थेट दार ढकलून आत .. काकुंकडे स्वयंपाकघर आणि मधल्या खोलीच्या मधे एक छोटीशी पायरी होती त्यावर जाऊन बसले .
काकूंनी विद्याताईला हाक मारली .. मग ताईने छान पातळ चपाती लाटली आणि पहिली गरम गरम चपाती मला वाढलीबरोबर तोंडलावणी म्हणून साखर !आहाहा अजुनही आठवलं तरी ती चव ..आणि त्याबरोबरच ताज्या चपातीचा आणि सुगंधित उदबत्तीचा दोन बाजुनी येणारा वास एकदम heavenly ..

ताई ची चपाती करण्याची पद्धत पण खास होती. माझं पहिलं वाहिल चपाती ट्रैनिंग म्हणा ना! ती कणकेचे छान मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करत असे. सगळे गोळे अगदी एकसारखे ~ साच्यातून काढल्यासारखे .. मग पिठी मध्ये छान घोळवून त्याची गोल लाटी करायची त्यावर बोटानी थोडे तेल लावायची आणि थोडी पिठी भुरभूरायाची आणि त्याचा चतकोर आकार करून पुन्हा पिठित घोळवून मग छान पातळ गोल चपाती लाटत असे .. आज ३० वर्षानंतर सुद्धा मला रोज चपाती करताना मला तिची ती चपाती लाटण्याची कृती आठवते.

माझी आई खरतर सुगरणअन्नपुर्णाच म्हणा ना पण मला ती समोरच्या काकुंकडची चपाती भलतीच आवडायची .. जवळजवळ रोज मी काहीतरी करुन त्याचवेळी काकूंकडे जायचे आणि आईला हे आवडायचं नाही.एकतर आमच्या घरात सकाळसंध्याकाळ दोन्हीवेळी ताजी चपाती बनत असे आणि त्या बरोबर ताजी भाजीही. पण ते सोडून मी रोज का शेजारांच्याकडे जायचे हे पण तिला कळायचंच नाही. एकदा तर ती खास माझ्याबरोबर आली आणि काकू चपात्या कशा करतात ते पाहीलं आणि घरी मला अगदी तशीच्या तशी चपाती करून दिली पण छें: मी कुठली सोडते काकुंकडे जाणं..

बहुतेक मी वर्षांची असेन तेंव्हा .. पुढ़े बहुतेक मोठी झाले आणि ती सवय आपोआप सुटली ..

आता मी आईच्या ठिकाणी आहे.. जेंव्हा माझ्या घरचे असेच वागतात तेंव्हा जाणवत आईला काय वाटत असेल .. अगदी साधं वरण किंवा आमटी जेंव्हा घरी केलेलं वाया जातं पण बाहेरचं मोठ्या चवीने खाल्लं जातं तेंव्हा कळतंय मी कशी वागत होते आईबरोबर !

म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!

 

Pooja Kulkarni-Manduskar is a member of the Angat Pangat Facebook Group.

 

 

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.