खांडवी (खाणपोळी)

Khaandvi

काहीशा कमी घटक पदार्थात बनवलेले, आधुनिक यंत्रसामुग्रीच्या तत्कालीन अभावामुळे मजबूत कष्ट करून ज्याला घाट घालणे म्हणतात असे पारंपरिक पदार्थ आजही तितकेच किंबहुना काकणभर सरस आहेत, पहिल्या घासाला त्या सुगरणीला दाद देण्याची क्षमता या पदार्थात आहे, जिभेवर घास ठेवावा आणि जणू ब्रह्मानंदी टाळी लागावी अशी त्याची चव, आणि आई, आजी यांनी घटक पदार्थासोबत त्यात कायम ओतलेलं प्रेम यामुळे त्या पदार्थाना आलेली अवर्णनीय चव याला खरंच तोड नाही.

पाटपाणी या सदराच्या निमित्ताने नानाविध पारंपारिक पदार्थ येऊ घातले आहेत, काही अगदीच नवीन, काहींची कृती नवीन, काहींत घटक पदार्थ वेगळे असे एक ना अनेक प्रकारे निष्णात सुगरणी पदार्थ आपल्यासमोर मांडत आहेत, आई, आजी, सासू यांच्याकडून परंपरेने चालत आलेल्या या पदार्थाना जपणं हे अवघड काम तडीस जातंय. या बाबतीत सर्वच सुगरणींना मनापासून सलाम. तर अशा वेळी एका कोकणी, खवैया माणसाला घराकडचे पदार्थ आठवले नाहीत तर नवलच. मी घरापासून लांब राहतो पण आजही घरी असताना आई, आजीच्या हातच्या खाल्लेल्या त्या पदार्थांची चव जिभेवर सतत रेंगाळते. तर अशाच एका वैयक्तिक माझ्या आवडीच्या ज्याला खांडवी किंवा खाणपोळी असंही म्हणतात त्याची कृती इथे देतो आहे.

साहित्य :
१)तांदळाच्या कण्या किंवा इडली रवा १ वाटी.
२) इडली रवा किंवा कण्यांच्या तीन पट पाणी.
३) एक वाटी किंवा चवीनुसार गुळ(गोड गोष्ट ही गोडच हवी म्हणणारे माझ्यासारखे खवैये गुळ जास्त घालतात).
४) जायफळ/वेलची पूड
५) ओलं खोबरं
६) कण्या भाजण्यापुरतं तूप

कृती :
कढईत थोडं तूप घेऊन त्यावर तांदळाच्या कण्या मंद आचेवर खमंग भाजून घ्या, त्या नंतर त्यात ३ पट पाणी घालून त्या शिजवून घ्याव्या. कण्या शिजतेवेळी त्यात अगदी किंचित मीठ आणि रंगासाठी थोडीशी हळद घालावी. कण्या उत्तम शिजल्या की त्यात आपल्या गोडाच्या आवडीनुसार गुळ घाला, शिजलेल्या कण्या वाढतात त्या अंदाजने गुळ घालावा. चांगलं ढवळून थोडावेळ झाकण ठेवावं आणि शिऱ्यासारखी किंवा किंचित पातळ(दक्षिण भारतीय उपम्यापेक्षा किंचित घट्ट) असं तयार झालं मिश्रण की त्यात जायफळ किंवा वेलची पूड घालून छान ढवळून बाजूला ठेवावं. साधारण कोमट, हात घालता येईल इतपत तापमान कमी झालं की एका ताटाला तूप लावून वड्यांच्या आकारात थापून ठेवावं, शेवट याच्या वड्या पडून त्यावर ओलं खोबरं आणि तूप घालून खायला द्यावं.

*हळद अगदी बेताची घालावी ती रंगापुरती असते, त्याची चव पदार्थात येऊ देऊ नये.
*इडली रवा ही पारंपरिक कृतीला पर्यायी सोय आहेत त्यामुळे कण्या उत्तम मिळाल्या तर त्याच घ्याव्या.
*शिजवताना चिमूटभर सुंठ घालावी, छान चव येते, अर्थात सुंठ ही आवडीनुसार आहे, अत्यावश्यक साहित्यात मोडत नाही.

 

Vyankatesh Karambelkar is a member of the Angat Pangat Facebook Group.

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.