डबा

**Prashant Kulkarni is one of the most popular writers on Angat Pangat. He is known for his satire and humour, and his keen observation.**
माझा डबा हा माझ्यासाठी फार जिव्हाळयाचा आणि प्रेमाचा विषय….
मला तर कधी कधी वाटत की मी केवळ या डब्यासाठीच ऑफिसला जातो…
कित्येकदा मला ऑफिसला जायचा कंटाळा येतो, तरीही या डब्यासाठी ऑफिसला जातो, दोन तीन तास टाइमपास करतो, डबा संपवतो आणि निघुन येतो.
खर तर म्हाळसाने सकाळी डबा तयार करन, तो तिने भरन, मी तो ऑफिसला घेवून जान आणि दुपारी मी तो संपवन, हा संपूर्ण डब्याचा प्रवास म्हणजे माझ्या आणि म्हाळसाच्या नात्यातल्या भावबंधाचा सोहळा असतो…
सकाळी ज्या तन्मयतेने आणि एकाग्रतेने ती एक एक पदार्थ तयार करत असते आणि माझ्या डब्यात भरत असते की जणू एखादा गायक आपल्याच रागदारी गायकीत इतका रममाण होवून गेलाय की तो अगदी तल्लीन झालाय…
एक एक पदार्थ डब्यात भरताना त्या बरोबर जणू ती तिच्या भावना, तीच मनही सुध्दा डब्यात भरत असावी…
एका छोट्या डिश मध्ये ती जेंव्हा माझ्या डब्यासाठी दही भात, त्यावर फोडनी आणि आणखी बरच काही घालून ज्या तन्मयतेने कालवत असते ना की तेंव्हा वाटत की त्यात ती माझ्या विषयीच प्रेम, माया, आदर, विश्वास, ई अस सगळ कालवून देतीय.
सगळा डबा भरुन पॅक करुन दिला की, तिच्या दिवसाच्या एका पर्वाची सांगता होते..
मला ऑफिसात दिवसभर ढिगाने कामे असतात पण माझ सार लक्ष्य डब्यावर असत..
दुपारी एक दीड झाला की मी डब्याला जवळ घेतो..
तो उघडत असताना जाणवत की जणू म्हाळसाच्या आणि माझ्या नात्यातला एक एक पदर मी उलघडतोय..
पहिला डबा पोळ्यांचा …त्या दुमडून दिलेल्या पोळ्या पाहिल्या की वाटत जणू तिन तीच हृदयच घडी करून डब्यात भरुन दिलय…
त्याच पोळ्यात दडलेली चटणी किंवा ठेचा, तिच्या लटक्या रागाची आठवण करून देतो…
डब्यातल्या एक दोन भाज्या, आमचा नात्यातल्या रसरशीतपणाच्या साक्षी असतात..
बरोबर दिलेले फरसान, चिवड़ा, शेव, नात्यातला चटपटीतपणा दाखवून जातो…
कोशिंबीर, सैलेड आमच्यात भरलेल्या सळसळत्या उत्साहाचे प्रतिक असते…..
मधन मधन ताकाचा स्वाद उगाचच जिभेवर आंबट गोड आठवणी रेंगाळत ठेवतो….
आणि शेवटच स्वीट म्हणजे म्हाळसाच्या आणि माझ्या काही रोमेंटिक आठवणींचा गोडवा ….
माझा डबा हा केवळ मी जेवत नसतो तर तो साजरा करत असतो एक उत्सव माझ्या आणि म्हाळसाच्या भावबंधाचा आणि तो ही रोजच…

Also see

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.