स्वयंपाक घरात झालेले संस्कार

**Shakti Salgaokar is a writer and custodian of the Kalanirnay legacy. Her posts on Angat Pangat are laced with snippets from Malwan and her band with her grandparents.**

दिवाळीची पहाट म्हणजे उटणं, मोती साबण, फराळ आणि नवीन कपडे ! पण या दिवाळीच्या पहाटेपर्यंत पोहचायचा जो बिल्डअप असायचा तो अगदी एका अनपेक्षित सिनेमाच्या गोष्टीसारखा उलगडला जायचा. दिवाळीची चाहुल ही सहामाही परिक्षेच्या आगमनाने लागत असे. शेवटचा पेपर दिला की, ‘‘आता सुट्टी सुरु ! असं वाटतं नं, वाटतं तोवर दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास, टयुशनचे एक्स्ट्रा क्लास आणि घराची साफ-सफाई सुरु होत असे. जितका कंटाळा करुन कपाट आवरले जायचे, तितक्याच उत्साहाने नवीन कपडे घेतले जायचे.

खरंतर आमच्या घरात दिवाळीपेक्षा गणेशोत्सवाचा उत्साह कितीतरी पटीने अधिक असतो. पण दिवाळी साजरी होतेच. फराळ म्हणजे मनुआईचे (माझी आजी) सिगनेचर बेसनाचे, चुरम्याचे लाडू. तिचा फुलविलेल्या पोह्यांचा चिवडा आणि अगदीच चांगला मूड असला तर चकल्यांचा घाट असायचा. या व्यतिरिक्त आई करंज्या, कानवले, शंकरपाळ्या इत्यादी बनवित असे.

पण दिवाळीच्या फराळाची मदत आम्ही आईला किंवा मनुआईला (आजी) कधीच केली नाही. आमची मराठी भाषा सुधारायला हवी आणि इंग्रजी मिडीयममध्ये शिकून सुद्धा मराठी वाचण्याचा सराव व्हायला पाहिजे म्हणून घरात जमलेल्या विविध दिवाळी अंकातले लेख मनुआई आणि आई आम्हाला वाचायला लावत असत. आम्हाला रस वाटेल असे विषय किंवा आमच्या ओळखीचे लेखक निवडून एखाद्या कागदाचा तुकडा किंवा पेन्सिल, बुकमार्क म्हणून वापरली जायची. आम्ही मुली म्हणून आम्हाला स्वयंपाक करता यायला हवा असा हट्ट आमच्या घरात कधीही कोणीही केला नाही. तरीदेखील आम्हा दोघी नातींना स्वयंपाकघरात आयुष्याचे मोलाचे धडे मिळाले. वेगवेगळे दिवाळी अंक वाचत मनुआईच्या स्वयंपाकघरातल्या एका कोपऱ्यात बसलेले असताना सहज कुतुहल वाटायचे आणि दिवाळी अंक बाजूला ठेवून कधीकधी एखादा पदार्थ कसा बनवायचा आणि का ॽ ह्यावर लक्ष जायचं. स्वयंपाक घरामध्ये बुद्धीचे आणि शरीराचे पोषण व्हायचे हे मात्र खरे !

आमची मनुआई तशी भयंकर स्ट्रिक्ट होती, ती फक्त स्वयंपाकाच्या प्रोसेसबद्दल, बाकी बाबतीत ती एक रिबेल होती. मिक्सरवर वाटलेलं खोबरं गरम होत आणि त्याची चव जाते म्हणून वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत पाट्यावर वाटण करणारी मनुआई इतर बाबतीत भयंकर आधुनिक कशी वागत असे हे गणित मला आजपर्यंत सोडविता आलेले नाही. नरक चर्तुदशीच्या दिवशी सकाळी उठून बाबा आणि पप्पा (आजोबा) तुळशीपाशी जाऊन कारीट फोडत असत. ‘‘फक्त बाबा आणि पप्पा का, आम्ही का नाही कारीट फोडायचे ?’’ असे जेंव्हा तिला विचारले, तेंव्हा क्षणभर विचार करुन लगेच एक कारीट काढून माझ्या समोर तिने ठेवले. नरकासुराचे मस्तक समजले जाणारे कारीट घरातल्या पुरुषांनी पायाखाली चिरडायचे असते. एका प्रश्नात मनुआईनी वर्षानुवर्षे चालू असलेली प्रथा पटकन बदलली. हे फेमिनिझम नाही तर काय ? अशा बऱ्याच पुरुष प्रधान आणि स्त्रीप्रधान असलेल्या चालीरितीबद्दल प्रश्न विचारायचा कॉन्फिडन्स मनुआई आणि पप्पांनी (आजोबा) आम्हा दोघी नातींना नेहमीच दिला आणि जिथे शक्य असेल तिथे काळानुरुप बदलायचे धाडसही त्या दोघांनी दाखविले.

स्वयंपाक घरातले संस्कार हा विषय मांडायचा झाला तर एका लेखात काय तो आटोपणार नाही. म्हणून मनुआईची एक पाककृती आणि ती शिकविताना तिने दिलेल्या शिकवणीसहीत लिहायचा प्रयत्न केलाय.

बेसन लाडू

साहित्यः १ किलो जाडसर बेसन, ¾ किलो तूप, ¾ किलो भुरा साखर (आवडीप्रमाणे) कमी जास्त, २०-२५ पिस्ते, २०-२५ बदाम (काप केलेले), वेलची पूड (अंदाजे), अर्धी वाटी दुधात भिजवलेले केशर खलवून घेतले.

कृतीः टीव्ही, मोबाईल आणि अतिरिक्त टाईमपासची साधने सायलेंट मोडवर आणि दुसऱ्या खोलीत ठेवावी. बंद करुन ठेवलीत तर उत्तम. आता एक मोठा टोप (पातेले) गॅसवर ठेवायचा आणि त्यात तूप घालायचे. जरा तापले की त्यात बेसनाचे पीठ घालावे. आता जाडसर बेसन म्हणजे काही दुकानात मिळते ते स्पेशल लाडू बेसन पीठ घालायचे. मिळेल ते साहित्य वापरुन स्वतःच्या आयडिया त्यात घालून रेसिपी बनविणे हे सुगरणीचे कौशल्य असते. आणि कोणतीही शहाणी व्यक्ती ही परफेक्ट गोष्टी मिळेपर्यंत एखादं काम करायची थांबून राहत नाही. त्या गोष्टी आपण मिळवायचा प्रयत्न करायचा पण नाहीच मिळाल्या तर गो अहेड अॅण्ड इनोवेट. हे बोलत असताना एका हाताने टोप (पातेले) धरुन दुसऱ्या हाताने कावीलथा जोराजोरात फिरवून बेसन नॉनस्टॉप हलवत राहणे क्रुशिअल आहे याची नोंद घ्यावी. बेसन भाजताना गॅस अगदी मंद असावा. भाजण्याच्या प्रक्रियेला तीस ते चाळीस मिनिटे लागतात. यावेळेत बेसनावरचे लक्ष अजिबात हलू दयायचे नाही. बेसन मात्र सतत कान्स्टन्ट्ली हलत राहिले पाहिजे. बेसन भाजले गेले हे कसे कळेल ? बेसनाचा रंग थोडासा बदलतो आणि एक खमंग वास सुटतो. नेहमीचा अनुभव व ह्या वासावरुन तुम्हाला नेमके बेसन भाजून झालंय की नाही हे कळेल. पण घाई आहे म्हणून गॅस मोठा केला किंवा मल्टीटास्कींग करायचा प्रयत्न केला तर हे लाडू फसणार !

भाजलेल्या बेसनामध्ये केशर मिश्रित दुध घालायचे आणि ढवळत रहायचे. दुध घातल्या घातल्या बेसन फुलून येईल. पण थोडा वेळ परतल्यावर ते थोड सेटल होईल. जरा तूप सुटेपर्यंत ढवळत रहायचे. आता गॅस बंद करावयाचा. या गरम गरम मिश्रणातच बदाम, पिस्ते काप, वेलचीपूड घालायची आणि साखर घालून नीट परतून घ्यायचे. आता वाटीभर बेदाणे किंवा पिस्त्याचे काप घेऊन टीव्ही समोर बसायचे. जर आई, आजी, बहिण किंवा मैत्रीण तुमच्याबरोबर असेल तर एकमेकांशी गप्पा मारत हसत-खेळत लाडू वळायचे. नवरा, भाऊ, बाबा, मित्रांनाही कामाला लावायला हरकत नाही, पण वळलेले लाडू वळता-वळताच अर्धे होतात असा माझा अनुभव आहे. आजकाल प्रमाण नियंत्रण (पोरशन कंट्रोल) म्हणजे थोडया-थोडया प्रमाणात खाणे तब्येतीसाठी चांगले मानले जाते. मात्र छोटे-छोटे लाडू वळायचे म्हणजे भरपूर जास्त वेळ लागेल त्यामुळे तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ आणि आपल्या आवडत्या लोकांची डायटरी रिक्वायरमेंट यांचा मध्य साधून साधारणतः हातावरती मावेल एवढे मिश्रण घ्यायचे आणि त्याचे लाडू वळायचे. जर वेळ नसेल तर प्लॅनिंग करुन एखाद्या दिवशी बेसन भाजून मिश्रण करून डब्यात भरुन ठेवले तरीही चालेल. मग लागतील तसे, वेळ असेल तेंव्हा लाडू वळायचे.

टिपः हे लाडू करताना साजूक तुपच वापरावे. तुपाचे प्रमाण कमी होता कामा नये. कारण मग लाडू सुके होतात आणि टाळूला चिकटतात. बेसन भाजणे हे या रेसिपीतले सर्वात महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे ते एन्जॉय करायचे. बेसन भाजताना फक्त बेसन भाजण्याबद्दल विचार करायचा. कारण कुठलेही काम चोख करायचे असेल तर ते काम सोडून दुसऱ्या कशाचाही विचार केला तर चालत नाही. बेदाणे काही लोकांना आवडत नाहीत. त्यामुळे वळलेल्या लाडवांवर पिस्त्याचे काप, काजू किंवा बदामाचे काप लावले तरी चालतात.

मनुआईने मला दिलेली ही रेसिपी, माझ्यापरीने, तिची शिकवणी इंक्लूड करुन लिहीली आहे. मनुआईचे लाडू वर्ल्डफेमस होते. आमच्या घरी येणाऱ्या लहानमोठया प्रत्येक व्यक्तीला मनुआईच्या हातच्या लाडवांच्या जादूची चव मिळत असे. हे तिचे लाडू प्रेम मनुआईनी २००२ साली दैनिक लोकसत्तेत ‘लाडूच लाडू’ नावाच्या सदरातून प्रसिद्ध केले आहे. ह्या तिच्या ५२ लाडवांच्या रेसिपीचे पुस्तक २००४ साली त्याच नावाने प्रसिद्ध झाले.

Also see

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.