वेळ स्वैपाकाची

**Vaishali Gore is a pioneering special needs educator and Sanskrit scholar. Her comments laced with maternal warmth help bring down the temperatures of heated arguments on Angat Pangat!** 
लग्नाच्या आधी स्वैपाकाशी फारसा संबंध कधी आलाच नाही. आमचा संबंध फक्त “खाण्याशी”! शाळा असायची ११ ते ५. सकाळी दहाच्या सुमाराला सगळं आवरून  जेवायला बसलं कि गरमागरम पोळी पानात. आम्ही सगळे जेवून शाळेत गेलो की निवांत मागचं सगळं आवरून आई स्वतः जेवायला बसत असावी!

 

पुढे कॉलेज मध्ये गेलो तेव्हा कॉलेज कॅन्टीन, “वैशाली हॉटेल” असे अड्डे जमायला लागले. आम्हा “आर्ट्स” च्या विद्यार्थ्यांना कॉलेज सकाळचं, त्यामुळे नंतरचा बराच वेळ “तिकडेच” जायचा! गप्पा गोष्टी, रमत गंमत घरी येणं…त्यामुळे कधीतरी एखादा पदार्थ हौसेनी करून बघितला तर…पण हेही कमीच.

 

पण एक मात्र होतं आमच्या घरी, जेवण कायम गरमागरम! आधी करून ठेवलाय आणि मग परत परत गरम करून वाढलाय असं मला फारसं कधी आठवत नाही. सकाळी पोळी आणि रात्री भाकरी किंवा दशमी अगदी तव्यावरून पानात! कुकरचं झाकण पोळी संपे पर्यंत उघडेल अशा अंदाजानं लावलेला असायचा.

 

लग्नानंतर सासरी आले. गाव वेगळं, माणसं वेगळी, जेवणाची पद्धत वेगळी आणि जेवणाच्या वेळा तर अगदीच वेगळ्या! स्वैपाकाची वेळ तर त्याहून वेगळी. सकाळी मी उठून खाली येईपर्यंत सहा-साडे सहा वाजलेले असायचे. तोपर्यंत माझ्या सासूबाईंचा बराचसा स्वैपाक–अगदी पोळ्यांसकट–झालेला! ओट्यावर झाकून ठेवलेल्या पदार्थांची झाकणं उघडून बघायची, “सगळंच झालं ?” असा जीभ चावून विचारायचं, आणि म्हणायचं, “मी आहे ना, आता तुम्ही पहाटे पहाटे उठून सगळं का करून ठेवता? मी करत जाईन….” असा मी म्हटलं कि त्या म्हणायच्या, “अगं, ह्या वयात झोप कमी; पहाटे जाग आली कि करायचा काय? म्हणून करून ठेवते. अजून बाकीची खूप आहेत कामं–ती तुम्ही करा! दुसरा कुकर तूच लावत जा!” मग चहा-नाश्ता, आला-गेला, असं जे सत्र सुरु व्हायचं, ते थेट दुपारी २-२:३० वाजे पर्यंत. आमचं घर गावात मध्यवर्ती ठिकाणी, तिथेच आमचा एक दवाखाना, एक एक्स -रे क्लिनिक, आणि एक आयुर्वेदिक औषधांचं दुकान! गाव फार मोठं नाही. त्यामुळे जराश्या ओळखीचंही कुणी आलं कि घरी वर येणारच, प्रत्येकाला चहापाणी! पहिल्यांदा माझा भाऊ आमच्याकडे आला, तेव्हा म्हणाला, “तुमच्याकडे पाण्याच्या टाकीच्या बाजूला अजून एक टाकी बांधून घ्या चहासाठी!” एवढा धबल्गा.

 

नंतर विचार केला कि आता वाटतं, एवढी सगळी उस्तवार करायची, शिवाय आल्यागेल्याशी गप्पा मारायची हौसही होतीच! त्यामुळे स्वैपाकाचा मुख्य काम झालं कि मोकळीच, असा विचार केला असावा सासूबाईंनी. स्वैपाक तयार आहे, केव्हाही, कुणीही या जेवायला! जेवणं दुपारी १-१:३० ते ३-३:३० पर्यंत चालायची. मनातून मला सारखा वाटायचं पहाटेचा स्वैपाक, परत परत कितीदा गरम करायचा!

 

जसजसे दिवस गेले, तसतसे आमच्या कुटुंबातही अनेक बदल घडत गेले. आम्ही नवीन घरात राहायला गेलो. काकुंचाही (सासूबाईंचा) कामाचा जोम जरा ओसरला वयपरत्वे! एकदा वाटलं, आता आधीच राबताही थोडा कमी आहे, जमेल आपल्याला गरमागरम जेवण करून वाढणं! पण सकाळी मुलांचे अभ्यास, सर्वांचा नाश्ता, सकाळी करावे लागणारे डबे, माझी शाळा…ह्या साग्क्यात मी पुनः कधी “सोयीनुसार” पहाटे स्वैपाकाकडे वळले ते माझा मलाच कळलं नाही. नवरा, मुलं उठायच्या आत, गाजर लावून लवकर उठून माझा सगळं स्वैपाक, नाश्त्याची तयारी इत्यादी सगळं झालेलं असायचा.

 

एकदा माझी मामेबहीण आली होती घरी–ती मुंबईची, नोकरी करणारी. ती म्हणाली, “मी पण तुझ्यासारखाच करते ग; सकाळी ९ ते रात्री ९ माझं किचन बंद!” मला बरं वाटलं! मनात जी अपराधी भावना होती कि आपण गरम जेवण वाढत नाही, ती थोडी कमी झाली. नंतर एकदा माझी भाची आली अमेरिकेहून. ती म्हणाली मी २-३ प्रकारच्या डाळी, ५-६ भाज्या एकदाच वेळ मिळेल तेव्हा करून फ्रीझर मध्ये ठेऊन देते. लागेल तसं  काढून गरम करायचं! आता तर काय, प्रत्येकाकडे फ्रिज, मायक्रोवेव्ह. त्यामुळे सोया किती झालीये!

 

खरंच, काळानुसार ताजं-शिळं ह्या सगळ्या संकल्पना बदलताच गेल्या. पण तरीही, अजून “पहिल्या वाफेचा ऊनऊन भातानी तव्यावरची गरम पोळी पानात” याची मजा दुसऱ्या कशाला येत नाही, हे खरंच.

 

लग्नापासून आतापर्यंत जवळपास ४५ वर्षांहून जास्त काळ मी उठले कि विळीवर भाजी चिरायला घेते, एकीकडे चहाचं आधण चढवते. स्वैपाकाची वेळ सकाळी लौकरचीच! स्वैपाकाला वेळ किती लागतो यावरही आमच्याकडे मजेदार विभागणी आहे. लवकर उरका पाडणाऱ्या “झटपट” विद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि सावकाश काम करणाऱ्या “मंदाकिनी” विद्यापीठाच्या! आता आपल्या सुना-मुली आल्या, त्यांची विभागणीही ह्या दोन गटात झालेली आहे.

 

तर मैत्रिणींनो, सांगा तुम्ही कसा आणि कधी करता स्वैपाक? आमटी-भात, भाजी-पोळी कर्ण ना रोज? पिझ्झा-पास्ता-नूडल्स वगैरे पदार्थांनी अतिक्रमण सगळ्यांच्या घरात केला आहेच पण तरीही… आपल्या पदार्थांचा आपलेपण टिकवलं आहे ना?

 

तुम्ही काय वेळ स्वैपाकाची? रोजचा किती वेळ स्वैपाकघरात जातो? या प्रश्नांची उत्तरं ऐकायला मी उत्सुक आहे, तर अंगत पंगत वर तुमच्या स्वैपाकाच्या वेळचा गुपित सांगूनटाका मला! आणि हो, आता तुम्हाला माहित आहेच, माझा स्वयपाक सकाळी लौकर झालेलाच असतो, केव्हाही या जेवायला!

Also see

7 Comments
 1. Wonderful article from my vahini. Took me back to Mothe ghar and my Kaku. Vahini, “ardha cup chaha thevtes ka?”, Was the regular phrase at home used by nanakaka, Baba, Vinaydada as the dropped in from davakhana or X-ray institute. Still remember each and every moment fondly.

 2. First Hearty congratulations.i have learned lot of things in angat pangat.And thanks for accepting my posts also.keep it up my friends.

 3. सुंदर लिहील आहे . अगदी मनापासून पटले . मंदाकिनी अन झटपट या उपमा आमच्या आईकडे आजही वापरल्या जातात . नोकरी करत होते त्यामुळे सकाळी ९च्या आत किचन बंद व्हायचच . आता रिटायर झाले आहे तरी पण सकाळी काम लवकर आटपलेली छान वाटतात . गरम गरम खायच वेड असल तरी सोय बघायची .. तरी मी पण लवकर झटपट या सदरातच मोडते . परत एकदा नोकरीतील आयुष्याची सफर घडवून आणलीत !! खूप सुंदर

 4. Very good article… Agadi Mazya manatale.
  Even I was having the same guilt in my mind… But now I don’t have it.
  Being working woman in Mumbai I spend hardly 2-3hours daily in kitchen …bass..

 5. Tumhi lihilay tasech agadi mazya sasari n maheri aahe
  Pan mi matra suvarnamadhya kadhayacha prayatna karate.
  Mala swatahala sudhdha agadi lavkar swayampaak karun thevalya avadat nahi pan kaamanusar mi Vela badalate
  sat sun ani shakya asel tenvha aani padarthavar avalambun asate maza swayampaak Che ganit n vel

 6. फार सुरेख शब्दांमधे व्यक्त केलेले अनुभव! त्या बरोबरच जाणवला तो सहजभाव! कोणत्याही व्यक्ती किंवा प्रसंगाबद्दल judgemental न होता, matter of fact असे लिहिल्यामुळे अधिकच भावले. congrats. Keep on writing.
  मीरा गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published.