दिवाळी फराळाची अंगत-पंगत

**Sumant Sambrey is a poet, singer, and true-blue Khavaiyya, with a keen understanding of Vidarbha cuisine.**

दिवाळी म्हणजे आनंदाला उधाण, नात्यांचा दीपोत्सव आणि समृद्धतेची पावती. घरी-दारी, शेतांत, नद्यांत,  चोहीकडे विपुलता दिसून येते. संपन्नतेचा उत्सव जणू निसर्ग साजरा करत असतो. ह्या साऱ्याचा अनुभव दरवर्षी आपल्याला दिवाळी फराळाच्यानिमित्ताने येतो. दिवाळी फराळांच्या पदार्थांची प्रांतनुसार यादी करायची झाली तर त्यामध्ये आपल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची प्रचिती येईल.

दिवाळी आणि खाद्यसंस्कृती ह्यांचा मिलाफ, अगदी पूर्वीपासूनचा. दिवाळी आली की असं वाटतं, सगळ्या चवींचे वार्षिक संमेलन आहे. जिथे प्रत्येकाचा प्रातिनिधिक सहभाग असतो. दोन चवींमध्ये विशेष स्पर्धा असते – गोड आणि तिखट. प्रत्येक घरात हे विभाग स्वतंत्रपणे राज्य करत असतात. घरातील प्रत्येकाच्या स्वभावानुसार आवडी-निवडी असतात आणि त्यात ह्या दोन चवी अगदी मदतीच्या ठरतात. लहान मुलांची गर्दी असलेल्या घरातून साजूक तूप आणि रवा-बेसन किंवा रवा-ओला नारळ ह्या जिन्नसांचे राज्य असते. लाडवसारखे गोड आणि जिभेवर चव रेंगाळणारे पदार्थ म्हणजे दिवाळीसुट्टी मध्ये धुडगूस घालणारे, हळूच डब्यातून खाऊ पळवणारे बच्चे कंपनीच. लाडवावरच्या बेदाण्यासारखे त्यांच्या गालातले हसू मनाला समाधान देऊन जाते.

बच्चे कंपनी खुश झाल्यावर रावांच्याआवडीचा बेत आखला जातो. हा पदार्थ स्त्रीलिंगी असला आणि रावांच्या खास मर्जीतील असला, तरी महिलामंडळी अगदी प्रेमाने करतात. बाहेरुन काटेरी तरीही हवीहवीशी वाटणारी, खमंग, कधी चटकदार आणि खुसखुशीत, अशी ही चकली‘. हिची सिद्धता झाल्याखेरीज दिवाळी फराळाला शोभा नाही. तिचा नखराही तेवढाच असतो. तिचा राग-रंग, प्रमाणबद्ध वागणं आणि योग्य ते सोपस्कार करणं म्हणजे सुगरणीची कसरत. पण एकदा तिच्याशी गट्टी जमली कि महिलांना सुगरिणीचा मान मिळालाच म्हणून समजा. मात्र हिच्या धाकट्या बहिणीचे तसे जास्त लाड पुरविले जात नाही. मुळात ही तयार होतानाच सगळ्या डाळींचे गुणधर्म घेऊन येत असते अन विशिष्ट चवीसाठी हिच्यात काही मसाल्याचे पदार्थ समाविष्ट केले जातात. चकली आणि हिच्यात तसा फरक नाही पण तयार होताना, हिला ना कुठला सोऱ्या/साचा लागतो ना हिच्या अंगी काटेरीपण असते. बिचारी अगदी साधी हातावर तयार होते आणि सहज आकार घेते. हां, पण हिची खुमासदारी आणि लज्जत, चकलीच्या तोडीची बरं का!!. अशी ही कडबोळी.

ह्यांचे दोघे भाऊ, कधी नंतर तर कधी आधी (जशी सुट्टी मिळेल तशी ) उत्सवात सहभागी होतात. एक गूळ किंवा साखरेचा लाडका तर दुसरा कलौंजी आणि मिठासोबत खुश असतो. दोघे तसे जुळेच पण तऱ्हा जरा वेगळ्या. तर असे हे शंकरपाळे – खारे नि गोडे.

ह्या नंतर लगबग सुरू होते ती कान्होले / करंज्यांची. घरातल्यांच्या आवडीनुसार ह्यांची पोटं भरली जातात. कधी खव्याने तर कधी खोबरं-चारोळी-खसखस आणि पिठीसाखरेच्या सारणाने. आयत्या वेळी करण्यात आल्या, तर ओला नारळ आणि गूळ गुपचूप युती करून पोटात शिरतात. ह्यांचे फराळातील स्थान तसे विशेषच आणि हे वैशिष्ट्य त्यांच्या सुबक आकारामुळे असते. कधी ह्या साचेबद्ध असतात तर कधी कातरणीने रेखाटलेल्या. एखाद्या घरात आजीबाई फराळात सहभागी झाल्या तर हातावर ह्यांना मुरड घालून नटविले जाते.

अनेक घरांत लक्ष्मीपूजनाला हा नैवेद्याला हवाचह्या घटकाखाली बनविला जाणारा पदार्थ म्हणजे अनारसा‘. ह्याचे कौतुक भारी. ह्याची तयारी करताना सुगरणींना विशेष planning करावे लागते. ह्याच्या पिठाच्या अथवा हुंडीच्या प्रमाणापासून कढईत हासण्यापर्यंतचे सगळे सोपस्कार अनारसा ह्या पदार्थाच्या भाळी आहेत. काही घरात अनारसे करण्यापेक्षा माझे बाई फसतात, यंदा नको तो घाटच्या नावाखाली बाहेरून आणले जातात. दुकानांमध्येही हे लगेच संपतात. गुळाचे अनारसे विशेष रुचकर लागतात आणि त्यांचा रंग सोनेरी तांबूस असेल, तर काही विचारूच नका. 

ह्याच पंगतीतला आणखीन एक पदार्थ म्हणजे चिरोटा‘. तसे ह्याचे जिन्नस आणि कृती साधीच पण प्रचंड वेळ घेणारी. हा करताना मदतनीस साठंह्याची फार महत्वाची भूमिका असते. संसाराची घडी जशी अलगद हाताने, थोरामोठ्यांच्या सल्ल्याने आणि प्रेमाच्या ओलाव्याने बसते तशी निष्ठा व प्रेम चिरोटे करण्यात दाखवल्यास, हा पदार्थ एक वेगळेच रसायन बनून जाते. त्याला हाती घेतल्यावर तो मोडवत नाही आणि सोडवत त्याहून नाही. खुसखुशीत, कुरकुरीत, हलका कधी साखरेत मनसोक्त लोळलेला तर कधी पाकात चिंब भिजलेला. असा हा चिरोटा.

ह्या सर्व तिखट-गोड पदार्थांच्या कुटुंबाचे यजमानपद मात्र एका पदार्थकडे फार पूर्वीपासून आहे, तो म्हणजे चिवडा‘. पोहे (भाजके अथवा तळीव), चुरमुरे, धने-जिरे पूड, डाळ्या, दाणे, खोबरं, खसखस, गोडलिंब, आमचूर, पिठी साखर आणि फोडणीचे साहित्य इत्यादि जिन्नस वापरून केलेला पाकसोहळा. अगदी दर्दी खाणारे असतील तर सुकामेवा सुद्धा सढळ हस्ते वापरला जातो. खाता-खाता एखाद्या घासासोबत येणारा काजू किंवा बेदाणे, चिवड्याच्या सर्वसमावेशक चवीची पुष्टी देऊन जातात. विदर्भात चिवड्यामध्ये तळलेला किंवा कडकडीत उन्हात वाळवलेला कांदा, कधी लसूण, असे घातले जाते. फराळाचे इतर पदार्थ चाखायचे झाल्यास, चिवडा मदतीला धावून येतो. ह्या फराळाच्या पदार्थांची मोट बांधण्याचे काम आजपर्यंत चिवडा करत आला आहे आणि त्यामुळे हा झाल्याखेरीज फराळ झाला, असे म्हणता येणार नाही. चिवड्यासोबतच त्याची शोभा वाढवणारा एक पदार्थ म्हणजे त्याची धाकटी बहीण शेव‘. दिवाळीच्या दरम्यान ती माहेरपणाला आपल्या भावाकडे चवंग्याच्या रुपात येते. कधी ती रोडावलेली जाणवते, तर कधी अगदी ठसठशीत. कधी चुकून माकून ती पाकात उडी घेऊन गोडी शेवम्हणूनही मिरवते. माहेरवाशीण असल्या कारणाने ही फराळाच्या कोठीघरातून लवकरच मुक्काम हलवते. (घरी केलेली शेव कधी संपते हे कळतच नाही )

अशी ही दिवाळी फराळाची अंगत-पंगत, दरवर्षी आपल्या घरात असते. हल्लीच्या काळात इतर वेळेत सुद्धा हे सर्व पदार्थ एकमेकांना भेटत असतात. मात्र सणाच्या निमित्ताने सगळ्यांची एकत्रित भेट, दिवाळीतच होते. खरंच, ह्या पदार्थांच्या हौसेला मोल नाही. हल्ली तर बिना पासपोर्ट-व्हिसा ही मंडळी परदेशी सुद्धा संमेलनं घडवतात. तिथल्या वातावरणाशी, नैसर्गिक विविधतेशी पण ह्यांनी जुळवून घेतलंय.

एकंदरीत काय, जिथे मराठी माणूस आपले पोट घेऊन जाईल तिथे ह्या पदार्थांच्या चवींना घर अवश्य मिळेल. मागल्या वर्षी ह्यांच्या संमेलनात एक ठराव पारित झाला, तो असा की प्रत्येक सभासदाने मंगळावर जाणाऱ्या यानामध्ये आपली जागा आरक्षित करावी कारण येत्या काही वर्षात तिकडे ह्या पदार्थांचे संमेलन होणार आहे म्हणे!!! त्यांच्या ह्या चविष्ट प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा!

Also see

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.