तैल पुराण

**Suranga Date is the most prolific poet Angat Pangat has ever seen or will see! Her instantaneous verse always brings a smile to the group.**

 

मी “तेलावरील तवंग ” ह्याबद्दल एक पोस्ट लिहिली होती . लहानपणापासून , मोजक्या तेलात , सुंदर हलकी फोडणी देऊन केल्या भाज्यांची सवय,  कधीतरी केलेले तळण , आणि मांसाहार निषिद्ध घरात मोठी झाल्यामुळे, तवंग ह्या प्रकाराबद्दल मला चक्क शिसारी आहे.

एक तर मला त्याची जरूर वाटत नाही,  जे कोण त्याचे कौतुक करतात , किंवा एखाद्या पदार्थात ते असलेच पाहिजे असे म्हणतात , त्यांना स्वतःच्या आरोग्याबद्दल काही काळजी वाटते का, असा विचारावंसं वाटत.  आधुनिक लाइफस्टाइल मध्ये हॉटेल मध्ये जाणे वाढल्यामुळे , लोकांच्या  अपेक्षा बीदलल्या  आहेत, आणि “फेर अँड लव्हली” च्या धर्तीवर, अन्नाच्या रुपाकडे ज्यास्त लक्ष दिले जात आहे.

अर्थात , सुंदर साधे, स्वच्छ  राहायचे,का प्रचंड मेकअप लावून क्षणभंगुर हेरॉईन व्हायचे , हे आपण ठरवायचे.

मला उगीच वाटलं , तेलाची बाजू मांडावी …

 

कधी मी शेंगांशयातला दाणा ,
कधी खेळकर मोहरीचं बी ,
कधी  बाळबोध करडईचं .

 

माझं आयुष्य तसं खूप खडतर .
साधारणपणे सर्व वेळ घाणीत.
म्हणजे कच्रा नव्हे …
पण लाकडाचा  घाणा.

 

दोन दणकट लाकडाच्या दाब देणार्या
ओंडक्यांमध्ये बसून ,
एका गायीने मन लावून
तो ओंडका सतत फिरवून ,
स्वतः गाळलेला घाम,
आणि ओंडक्याने पिळून काढलले तेल .

 

मग आली  बिनमनाची यंत्र.
करकचून दाबून, सपाट करून,
सत्यानाश झालेल्या बियांमधून
विवध रसायने फिरवून ,
मग तीच रसायने उकळून काढून
टप  टप  तेल बाहेर येणे ,
आणि त्या तेलावर विविध प्रक्रिया करणे .

 

इतकं सगळं झाल्यावर
दाणेराव, मोहरीबाई, कर्डईआजी
अगदी मेटाकुटीला .

 

उर्वरित आयुष्य ,
हवेशीर जागेत, मंद ज्वाळेवर ,
मोहरी जिरे लोकांना कौतुकाने तडतडू देणे,
हिंगाबरोबर श्वास घेणे, आणि
रागावलेल्या मिर्च्यांवर
हळद आणि कढीपत्त्याची चादर पसरणे.
कुठल्याश्या भाजीला  पाण्याच्या झाकणाखाली
गोष्टी सांगून आपलेसे करणे,
आणि “इश्श्य, कशाला तसदी घेतलीत”
असे म्हणत खोबर कोथिंबीर लोकांचे स्वागत करणे.

 

पण कधी कधी
आपल्याला हव  असतं एक, आणि होतं दुसरंच .

 

जन्मोजन्मीचे नातं असल्यासारखं
बेसनरावानी निरनिराळ्या खाद्यपदार्थाना गुंडाळून येणे,
करडई आजींची गळाभेट,
आणि रोमान्स अगदी फुलून येणे .

 

हे परवडलं .

 

पण कधी कधी
कांदे , लसूण, खोबर, आलं , निरनिराळी कुटं ,
मोहरीबाई, दाणेराव, आणि कर्डईआजींना
अगदी पिचून काढतात,
स्वतः सर्वांनमध्ये लोकप्रिय राहण्यासाठी ,
ह्या तिघांना वेळोवेळी पिदवतात ,
आणि अगदी घाम निघून वर तरंगला
कि “क्या बात ! क्या बात !”  म्हणतात
आणि बघणारी ताव मारतात .

 

आपण ज्या काळात जगतो ,
त्याचं हे  प्रतीक का ?
स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी
दुसऱ्याची कदर न करणे,
एखाद्याला खूप बंधनं असली,
तर त्याला आणखीनच त्यात अडकवणे ?

 

का अजून एक असं जग आहे,
कि तिथे त एकामेकाचे गुणधर्म ओळखून
सामन्जस्यांने आणि कौतुकाने जगण्याचा
नेहमी प्रयत्न असतो ;
स्वतःच्या भरभराटीत दुसर्याचे पण नाव व्हावे
अशी मनापासून इच्छा असते ,
आणि ह्यामुळे सर्वांच्याच प्रकृतीचं कल्याण होत राहाते ?

 

लोकप्रिय गोष्टींच्या विरोधात जाणं कठीण जरूर असतं ,
पण अशक्य नसतं .

Also see

No Comments Yet

Leave a Reply

Your email address will not be published.