उकडीचा मोदक

**Shirin Mhadeshwar is a silent yet immensely talented member of the Angat Pangat group, and often writes in with her special anecdotes.**

रविवारची रम्य  दुपार. मी लॅपटॉप वर ऑनलाईन शॉपिंग करण्यात बिझी. नवरा क्रिकेट मॅच चं रिपीट टेलिकास्ट बघण्यात दंग आणि सासरे व्हाट्सअँप वर. सासूबाई किचन मध्ये काहीतरी खुटपूट करत आहेत याचा अंदाज आला आणि मी लॅपटॉप मध्ये घुसून जायची काय ती बाकी राहिले. तसा अगदी छत्तीस चा वगैरे आकडा नसला तरी जुन्या वळणाची आणि सुनेचं फारसं काही कौतुक नसणारी व्यक्ती अशी त्यांची मला जास्त ओळख होती.  सासूबाईनी संकष्टी म्हणून साग्रसंगीत जेवणाचा मोठा बेत आखला आणि मला उगीचच सोबतीलाही बोलवायच्या फंदात पडता त्यांनी स्वतःच सारण बनवायला घेतलं. उकडीच्या मोदकाचं.

काही गोष्टींचं, प्रसंगांचं, माणसांचं , स्थळांचं एकमेकांशी अलिखित नातं जोडलेलं असतं. जसं मरीन ड्राइव म्हटलं कि अजूनही सर्वात प्रथम आठवतो तो एका दशकापूर्वी तिथल्या एका दगडावर बसूनमला आता अँकर टाकायचा आहे.. माझ्याशी लग्न करशील?” असं म्हणणारा..  समुद्राच्या वाऱ्यावर केस विस्कटलेला माझा गोड नवरा. बाकरवडी म्हणजे चितळे. बर्फ म्हणजे न्यू यॉर्क.. चपाती गुळाचा लाडू म्हणजे आई. तसं उकडीचा मोदक म्हणजे गणेशचतुर्थी. कोकण. आजी.

*******************

माझं बालपण कोकणात गेल्या मुळं गणपतीच्या माझ्या आठवणी खूपच साध्या सरळ धोपट मार्गी आहेत. अनंत चतुर्दशीला दूरदर्शन वर दिसणाऱ्या गिरगाव चौपाटीवरच्या महाकाय मूर्त्या, अवाढव्य देखावे आणि त्या बरोबरचा अफाट जनसागर माझ्या  छोट्याशा जगात कधी मावला नाही आणि म्हणून तो कधी आठवणीत पण राहिला नाही. माझ्या आठवणीतला गणपती आहे तो कोकणातल्या छोट्या छोट्या घरांतल्या सुंदर देखण्या मखरांमधला.

शाळेच्या घटक चाचण्या संपल्या कि लगेच गणपतीची चाहूल लागायची .. आता सोशल मीडिया वर उकडीच्या मोदकांच्या पोस्ट्स मुळे लागते ना साधारणतः तशीच.

आमच्या स्वतःच्या राहत्या घरी गणपती बसवत नसत. वडिलांच्या बाजूचं आमचं सारं कुटुंब अंदाजे वीस  किलोमीटर वर राहणाऱ्या आमच्या आजी आजोबांच्या छोटेखानी घरी जमत असे. किमान आठ ते दहा  सहकुटुंब आलेले परिवार (म्हणजे पंधरा वीस मुलं आणि त्यांचा उच्छाद! ) तिथं राहत .. कुणी दोन दिवस तरी कुणी अगदी चतुर्दशीचं विसर्जन उरकेपर्यंत! इन मिन दोन न्हाणीघरं आणि घराच्या बाहेर तीस पावलांवर असलेलं स्वच्छतागृह. तेही पाणी नसलेलं. प्रायवसी, पर्सनल स्पेस नामक कल्पना तेव्हा अस्तित्वातच नसाव्यात बहुधा.

चतुर्थीच्या दिवशी सकाळची आन्हिकं उरकली कि लगेच आम्ही आजीकडे जायला निघत असू. छान काठापदराची जरीची साडी नेसलेली; अंबाड्यावर गुलाबाचं फूल माळलेली आणि घाईगडबडीत पूजेचं ताट बनवणारी आई कोणत्याही कॅमेरात बंदिस्त नसली तरी अजूनही लखलखीत प्रकाशाइतकी स्वछ आठवते. आणि तिला तसं तयार पाहून बाबांच्या नजरेत येणारी कौतुकाची झालरही. सणासुदीला साडी नेसून, खास मंगळसूत्र घालून पाच पन्नास फोटो काढून घेऊन ते फेसबुक वर टाकल्यानंतर नवऱ्यानं निव्वळ तो फोटोलाईककेला नाही म्हणून रुसून बसणारी आमची पिढी. ते नजरेतलं ओझरतंलाईकआम्हाला काय कळणार!

गणपतीच्या दिवसांत नेहमीच मुसळधार पाऊस पडत असे. हवेतला चिंब गारवा आणि हिरव्यागार वनराई मधून आमची स्वारी आजीच्या घरी जाण्यासाठी रवाना  होत असे. मातीचा रस्ता  आणि आजीचं घर यामधल्या छोट्याशा जागेवरही त्यावेळी भातशेती करत. भाद्रपद येईस्तोवर पीकं अगदी तरारलेली असायची. त्यामधून बेतास बेत एक फूट रुंदीची चिखलाने माखलेली अन दगडांनी सावरलेली एक पायवाट. त्यावरून तोल सांभाळून घराच्या पायरी पर्यंत पोहोचणं म्हणजे एक दिव्यच.

पायरीवर आमची वाट पाहत उभी असलेली आजी भेटता क्षणी जवळ घेऊन, गालावर हात फिरवून विचारत असे.. “मोदक खातंलं?” आणि मला आईला स्वयंपाक घराकडे नेत असे. सगळी पुरुष मंडळी बाहेर व्हरांड्यातल्या बाकड्यांवर गप्पा मारत बसत आणि बायका किचन मध्ये. त्या लहान वयातहीहे असं काहा प्रश्न घेऊन मी बहुतेकांना सतावत असे. पणकामांचीहि वाटणी सर्वानीच गृहीत धरलेली असतानाही लहान मुलगी उगीचच बंडखोर आहेअशा नजरांपलीकडे माझ्या प्रश्नांना कधी फारसा भाव मिळाला नाही.

आजीनं सकाळपासूनच उकडीच्या मोदकांचा घाट घातलेला असे. तेही थोडेथोडके नव्हे तर किमान २००३०० तरी नक्कीच.. प्रत्येक मोदक अगदी साच्यातून काढल्यासारखा तेवढ्याच आकाराचा; तितकाच मोहक. बाहेर रमरमीत पडणारा पाऊस, स्वयंपाक घरातल्या चुलीवर उकळणारा काळ्या वाटण्याचा रस्सा, बाजूला जिरं आणि तुपात बनवलेलं वरण, नुकताच चुलीवरून उतरवलेला भात.. तो शिजलाय का हे एखादं शीत दाबून बघणारी काकी, फुंकणीतून निखाऱ्यांवरची राख फुंकणारी आत्या..आणि तिथंच पाटावर साजूक तुपात खमंग भाजलेल्या गुळखोबऱ्याच्या सारणाची परत समोर घेऊन हलक्या हाताने कळीचे मोदक वळणारी आजी.. किती साधं सुटसुटीत विश्व होतं ते.. आलेला प्रत्येक क्षण आहे तसा तेव्हाच्या तेव्हा अनुभवायचा. सतत तो फोनवर टिपण्याचा अट्टाहास नाही आणि त्याबरोबर येणारी लिमिटेड स्टोरेज ची चिंताही नाही. “बी हॅपी बी हॅपीअसाहॅपीराहायच्या संदेशांचा अथक मारा नाही.. आणि म्हणूनच जबरदस्तीनेहॅपीराहायचं दडपण पण नाही. दिवस छान जगायचा आणि मागे टाकायचा; कोणत्याहीआर्ट ऑफ लिविंगची मदत ना घेता.

चतुर्थीच्या दिवशी हमखास हरतालिका येत असे .. पण आजीनं कधीच कुणावर हे उपवास लादले नाहीत  उलट गणपतीला नेवैद्य दाखवायच्याही आधी ती साऱ्या सुनांना अगदी हट्टानं मोदक खाऊ घालत असे. जेमतेम चौथी शिकलेल्या आणि सोवळं ओवळं करणाऱ्या तिच्या व्यक्तिमत्वाशी जुळणारं तिचं हे पुढारलेपण; ढोलताशे बडवता सहज व्यक्त होणारं; हे आजही माझ्यासाठी एक उलगडलेलं कोडंच आहे.

एकीकडे स्वयंपाक घरात हि धांदल तर बाहेर अन देवघरात गणपतीच्या आगमनाची तयारी. थर्माकोलचे मखर.. रंगीबेरंगी तोरण .. झेंडूच्या माळा लटकलेल्या .. छोटासा देखावा.. अर्धी टीम चित्रशाळेकडे रवाना झालेली. मी बहुतांशी वेळा बाबांकडे हट्ट करून या पुरुषप्रधान गटाचा भाग होऊन चित्रशाळेत गणपती आणायला जात असे. तिथल्या शेकडो मूर्त्यांमध्ये आपली कोणती हे भिरभिरणाऱ्या नजरेला जेव्हा बाबा सांगत तेव्हा क्षणार्धात ती आपली होऊन जात असे. त्यानंतर धो धो पावसात गणरायाचं आगमन.. “गणपती इले गणपती इलेअसा चहुबाजूनी आरडा ओरडा .. मग मूर्तीची स्थापना, नेवैद्य, आरतीआणि हे सर्व आटोपलं कि पहिली पंगत बसत असे ..

मला त्या वेळी केळीच्या पानावर जेवायचं म्हणजे अगदी संकट येत असे. एकतर वरण, रस्सा, दही असे सगळे पदार्थ ओघळून जाऊ नये म्हणून ताटासारखी कडा नाही आणि दुसरं म्हणजे पानाच्या मधोमध असलेल्या खाचीतच माझा बराचसा वरणभात जाऊन बसे. अर्थात या तक्रारी ऐकायच्या मनःस्थितीत नसलेली आई सर्वांना वाढता वाढता बाबांच्या आणि माझ्या ताटात एक्सट्रा उकडीचे मोदक ठेऊन ते खाण्यासाठी दामटत असे.

मला नेहमी प्रश्न पडत असे.. एवढी शिकलेली, मस्त टापटपीत राहणारी आपली आई तीनचार  दिवसांसाठी का असेना त्या वातावरणाशी कसं जुळवून घेते! नुसतं जुळवून नाही तर त्याचा अखंड अविभाज्य घटक बनून जाते. कसं जमतं तिला प्रश्न विचारणं. अगदी हलकासा विचार केला तरी नाना प्रश्न पडावेत.. नवरा बाहेर गप्पा मारणार आणि मी इथं मोदक वळणार? पूजेचं ताट कुणी बाई का हातात धरत नाही? पहिली पंगत बायकांची का नाही? पुरुष का वाढत नाहीत त्यांना? असे कैक प्रश्न माझ्या आईच्या वतीने मला पडत. आणि त्यावर आईचं उत्तर ठरलेलं असे.. “अगं तुला होतो ना तेवढा ह्या साऱ्याचा मला त्रास होत नाही. तुझ्या आजीला मदत करायला मला आवडतं .. जसं  तिला आवडतं मला गणपतीच्याही आधी मोदक खाऊ घालायला. तुझ्या समानतेच्या आकसापेक्षा तिच्या नजरेतलं कौतुक मला जास्त प्रिय आहे. आणि खरं सांगू का बाळा, एकदा का हि सारी व्यवस्था आणि त्यातली माणसं आपली मानली ना कि त्यावर फक्त भरभरून प्रेम करावं. तुझं माझं करत राहू नये.”

तिचा हा स्वत्व गमावून वातावरणाशी एकजीव होऊन आनंदी व्हायचा मंत्र मला त्यावेळी कळायचा नाही. समज आल्यानंतर आणि अजूनही रक्तातली बंडखोरी फक्त प्रश्नच विचारत राहते .. हे असंच का? नवऱ्यानं आपल्यासाठी गाडीचं दार उघडल्यावर मनोमन खुश होणं आणि त्यानं आपल्या ड्रायविंग ला काळजीपायी चुकून काही म्हटलं तर तो विषय लगेचच पुरुषांच्या स्रियांबद्दलच्या धारणेपर्यंत नेऊन पोहोचवणं हि माझीच नव्हे तर माझ्या पिढीतल्या कितीतरी जणींची specialty आहे. शब्दांनी किस काढून नाती तावून सुलाखून गुळगूळीत करताना त्यातला निखळ आनंद कुठेतरी विनाकारण गमावून बसायची.

**************

एव्हाना सासूबाईंचं सारण जवळपास बनंतच  आलं होतं .. नवरा आणि सासरे अजूनही आपापल्या विश्वात मग्न. आणि अचानक काय वाटलं काय माहित पण मनावरचं एखादं चिलखत बाजूला केल्यासारखी मी त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं, “मला शिकवाल का, उकड कशी काढायची ते?” त्यानंतरचे तब्बल दोन ताससाचा नसताना मोदक कसे वळावेत’, ‘केशर सारणात कि उकडीतयावरचे You Tube व्हिडिओज बघण्यात; भावाला बहीण हवी आणि मोदकाला करंजी हवी अशा मनोरंजक गप्पा मारण्यात कधी गेले कळलंही नाही. सुनेनं बनवलेल्या ओबडधोबड एकवीस मोदकांचे फोटोज  कळी खुललेल्या सासूबाईंनी लगेच आपल्या मैत्रिणींना whatsapp पण केले.  आपला मुद्दा पटवून देण्याचं युद्ध जिंकण्यापेक्षा एखाद्याचं मन जिंकण्यामध्ये काय अफाट आनंद आहे हे त्यादिवशी मला असं जाताजाता जाणवलं. बंध बनायला नेहमीच अणुरेणू, दूरवरच्या आकाशगंगा, पु.लं किंवा जीवनाच्या तत्वज्ञानावरडीप कॉन्वर्सेशनसकरावे लागतात असं नाही. काहीवेळा एक उकडीचा मोदकच पुरेसा असतो. बंध बनवायला आणि टिकवायलाही.

Also see

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.